मुंबई:याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मॉरिशसमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय समाज आहे. तिथे आपले मराठी भवनसुद्धा आहे. मॉरिशस सरकारच्या वतीने आता तेथे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा १४ फूट उंचीचा पुतळा बसवण्यात येणार आहे. येत्या २८ तारखेला मॉरिशसचे पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
'त्या' भवनासाठी राज्य शासनाकडून देणगी: मॉरिशसमध्ये असलेल्या मराठी भवनाला २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने देणगी दिली होती. आता त्या भवनाचा दुसरा टप्पा तयार करायचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देणगी स्वरुपात ८ कोटी रुपये दिले आहेत. तेसुद्धा तिथे देण्यात येणार आहेत. सोबतच तेथे मराठी लोकांचे सम्मेलनसुद्धा होणार आहे. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस काही सामंजस्य करारांवरसुद्धा स्वाक्षरी करणार आहेत. तसेच पर्यटन व उद्योग क्षेत्रातसुद्धा महत्त्वाचे करार अपेक्षित असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठमोळे सण उत्साहात: मॉरिशसमध्ये असणाऱ्या मराठी बांधवांची संख्या जवळपास ७५ हजार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रामुख्याने सातारा, पुणे, रत्नागिरी या भागातून गेलेले बरेच मराठी बांधव आहेत. या सर्वांनी परदेशातही मराठी परंपरा व संस्कृती जोपासण्याचे काम केले असून येथे जवळपास मराठी बांधवांच्या ५४ संघटना आहेत. या सर्वांनी एकत्र येत १ मे १९६० रोजी 'मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशन' स्थापन केले. या फेडरेशनद्वारे महाराष्ट्र दिन, शिवजयंती, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी असे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जातात. अशामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा तेथे बसवण्यात येणार असल्याने या मराठी बांधवांच्या आनंदात अजून भर पडणार आहे.