मुंबई Shivaji Maharaj Statue :जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. आज (२० ऑक्टोबर) मुंबईतील राजभवनातून हा पुतळा रवाना करण्यात आला. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच पूजन आणि रथपूजन करण्यात आलं.
महाराजांच्या नावातच शक्ती आहे : 'आम्ही पुणेकर फाउंडेशन' व 'छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती' यांच्या पुढाकारानं तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला भेट देण्यात येणार आहे. यावेळी बोलताना राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. 'अनेक राजांनी स्वतःसाठी महाल बांधले. मात्र शिवाजी महाराजांनी महाल न बांधता राज्य रक्षणासाठी गडकिल्ले बांधले. शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती आहे. महाराजांचं नाव घेऊन मी प्रतापगडावर साडेपाचशे पायऱ्या चढून गेलो', असं राज्यपाल म्हणाले.
गडकिल्ल्यांचं फोर्ट सर्किट तयार करावं : पुढे बोलताना ते म्हणाले की, 'नव्यानं बांधण्यात आलेलं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक पाहण्यासाठी देशभरातून लाखो लोक येतात. मात्र देशातील फार कमी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले पाहिले आहेत. हे चित्र बदलायला हवं. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी शिवकालीन गडकिल्ल्यांचं फोर्ट सर्किट तयार करावं. तसेच पर्यटकांना सर्व किल्ल्यांची माहिती देणारे पुस्तक तयार करावं, अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांद्वारे तरुणांना प्रेरणा तर मिळेलच, शिवाय किल्ल्यांचा विकास झाल्यास त्यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं.