मुंबई -आरेमधील झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या सदस्यांना शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव धमक्या देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी केला आहे.
मुंबई मेट्रो कारशेडच्या बांधकामासाठी झाडे तोडण्याला विरोध केला जात आहे. मात्र, आरेमध्ये 'रॉयल प्लम्स' प्रकल्प उभारताना हजारो झाडे तोडण्यात आली होती. तेव्हा सत्ताधारी शिवसेना झोपली होती का? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे. आपल्याला दिल्या जाणाऱ्या धमक्यांबाबत पोलिसांमध्ये तक्रार करून पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
हेही वाचा - 'चांद जमीन पर', मुंबईच्या रस्त्यांवर आरजे मलिष्काचं नवं गाणं एकदा पाहाच
गोरेगाव आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारले जाणार आहे. त्यासाठी २७०० झाडे तोडली जाणार आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी या पक्षांच्या प्रतिनिधींनी झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.
दरम्यान, आज (गुरूवार) झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत पुन्हा सदस्यांना धमक्या देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालिका आयुक्तांच्या समोर हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.