मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला सातत्याने गळतीचा त्रास सहन करावा लागतो आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेचे अनेक बिनीचे शिलेदार शिंदे गटात जाऊन विसावले आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. नेत्यांना केंद्रीय यंत्रणांकडून दाखवली जाणारी भीती आणि काही नेत्यांची महत्वाकांक्षा याला कारणीभूत आहे. सद्यस्थितीत ठाकरे गटाकडून अजूनही अनेक नेते शिंदे गटात दाखल होताना दिसत आहे.
शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या अस्वस्थ? : शिवसेना महिला आघाडी मुंबईतील आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसते. या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिनी म्हणून नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, छाया कोळी, मनीषा कायंदे यांची नावे समोर येतात. मात्र शिवसेनेतील या महिला आघाडीच्या नेत्याही आता अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे अस्वस्थ असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. किशोरी पेडणेकर यांचाही आवाज दबला आहे, तर मनीषा कायंदे यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे.
महिला नेत्यांना काम नाही : या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार म्हणतात की, शिवसेनेमध्ये महिला आघाडीच्या नेत्यांना काहीच काम नसते. भाजप सारख्या पक्षांमध्ये प्रवक्त्यांनी कोणत्या विषयावर काय मते मांडायची याबाबत चर्चा होते. मात्र शिवसेनेत अशी कुठलीही कार्यप्रणाली नाही. त्यामुळे जर एखादे आंदोलन नसेल तर महिला नेत्यांना कसलेच काम उरत नाही. गेल्या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेतील महिला नेत्यांना अभावानेच संधी मिळाली आहे. त्यातच सुषमा अंधारे याच्या शिवसेनेतील प्रवेशाने शिवसेनेच्या आधीच्या महिला नेत्या बाजूला सारल्याचे दिसून येत आहे. महिला नेत्यांची ही खदखद गेल्या एक-दीड वर्षापासून दिसून येत आहे. त्याचाच परिपाक म्हणून मनीषा कायंदे या अखेर शिंदे गटात सामिल झाल्या आहेत.