मुंबई - औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहे. त्याच प्रमाणे मुंबई महापालिकेतही काँग्रेस आणि शिवसेनेचा वाद सुरू झाला आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना काँग्रेसवर दबाव आणत असून विरोधी पक्ष नेते पद भाजपला मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात छुपी मदत करणार असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. तर असा कोणताही दबाव आणला जात नसून छोटे-मोठे मतभेद बसून सोडवले जातील, अशी प्रतिक्रिया स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.
विरोधी पक्ष नेते पदावरून वाद
मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने विरोधी पक्ष पद घेण्यास नकार दिला होता. यामुळे हे पद तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला देण्यात आले. शिवसेना भाजप युती तुटल्यावर राज्यात महाविकास आघडीचे सरकार स्थापन केल्यावर भाजपने विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला. हा दावा महापौरांनी अमान्य केल्यावर भाजप उच्च नायालयात गेली. न्यायालयानेही भाजपचा दावा फेटाळून लावला. त्याविरोधात भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
सेना-भाजप जवळीक वाढली
याबाबत बोलताना रवी राजा यांनी शिवसेना आणि भाजप हे जुने मित्र पुन्हा जवळ येत आहेत. भाजपने विरोधी पक्ष नेते पदासाठी जो दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे, त्यात त्यांना लागणारी गुप्त मदत करण्याचा शब्द शिवसेनेने दिला आहे. हा सर्व प्रकार काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी सुरू आहे. मी वेळोवेळी स्थायी समितीच्या बैठकीत आवाज उठवत असल्याने आमच्यावर दबाव आणला जात आहे. मी मुंबईकरांच्या हितासाठी कायम काम करणार असून कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही, असे रवी राजा यांनी स्पष्ट केले आहे.