मुंबई :मध्यरात्री फेसबुकवर एका पेजवरून शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका ओपन जीपमध्ये एका रॅलीच्या कार्यक्रमात दिसत आहेत. ही रॅली म्हणजे सध्या भाजप आणि शिवसेनेची सुरू असलेली आशीर्वाद यात्रा असल्याचा दावा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या फेसबुक हँडलवरून करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये 'पप्पी दे पप्पी दे पारुला' हे गाणं देखील वाजत असल्याचे पाहायला मिळते. ज्या पेजवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, त्यामध्ये शिवसेना शिंदे गटावर अश्लील टीका करण्यात आल्याचा आरोप शितल म्हात्रे यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या :हा व्हिडिओ मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वायरल होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दहिसर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला. यावेळी शिवसैनिकांनी हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दहिसर येथे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमधला हा व्हिडिओ असल्याचा दावा सध्या समाज माध्यमांवर करण्यात येत आहे.