मुंबई -बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपण सत्तेत आल्यास बिहारमधील नागरिकांना कोरोनावर मोफत लस दिली जाईल, असे वक्तव्य केले आहे. यावर सर्व देशभरातून टीका केली जात आहे. सर्व राज्यातील नागरिकांची जबाबदारी केंद्र सरकारची नाही का? असा प्रश्न शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे.
देशभरात कोरोनाचा प्रसार झाला असतानाही बिहार विधासनभेची निवडणूका होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज भाजपाचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावेळी त्या म्हणाल्या, एनडीए सरकार यशस्वीपणे कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाच्या अनेक लसींच्या विविध स्तरांवर चाचण्या सुरू आहेत. आयसीएमआर ज्या कोरोना लसीला परवानगी देईल, ती लस बिहारच्या प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात येईल. कोरोनाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात तिचे उत्पादन घेण्यात येईल. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत मिळणार असे भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. मात्र, देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देणार का, याबाबत भाजपाने काहीही माहिती दिलेली नाही.