रत्नागिरी - आगामी निवडणुकीत कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना घरी बसवणार, असे विधान भाजप खासदार नारायण राणे यांनी केले होते. त्याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर जोरदार टीका केली आहे. 'ज्यांचे राजकीय अस्तित्वच संपलेले आहे, विसर्जित झालं आहे, त्यांनी शिवसेना विसर्जित करण्याची भाषा बोलू नये, त्यांना तो नैतिक अधिकारच नाही' अशी बोचरी टीका खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्यावर केली आहे. तसेच राणे यांनी शिवसेना संपविण्याची भाषा अनेकवेळा केली, मात्र तरीसुद्धा शिवसेना ठामपणे उभी राहिली, राणे यांना स्वत:चा पक्ष वर्षभर देखील टिकवता आला नाही, असा माणूस शिवसेनेचं विसर्जन काय करणार अशी टीका राऊत यांनी राणेंवर केली आहे. ते गुरुवारी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
'राजकीय अस्तित्व संपलेल्यांनी शिवसेना विसर्जित करण्याची भाषा बोलू नये'
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राणेचे राजकीय अस्तित्वच संपलेले आहे, त्यांनी शिवसेना विसर्जित करण्याची भाषा बोलू नये, असाही राऊत यांनी राणेंवर निशाणा साधळला आहे.
पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटक प्रकरणावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले, अर्णव गोस्वामीसारख्या विकृतीचा बोलवता धनी कोण आहे, हे भाजपने दाखवून दिले आहे. आम्ही महाराष्ट्र द्वेष्टे आहोत, हे आता अर्णवच्या निमित्ताने भाजपने दाखवून दिले. अर्णव असो किंवा कंगना असो, इंथ महाराष्ट्राची बदनामी करायची आणि स्वार्थ साधायचा हे भाजपनं दाखवून दिले असल्याचा आरोपही खासदार राऊत यांनी भाजपवर केला.
फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय झाल्यास तो योग्यच-
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कोरोनाला रोखण्यासाठी चांगली पाऊले उचलली गेली आहेत. तसेच कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही. प्रदुषण रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय झाल्यास तो योग्य असेल, असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.