मुंबई- पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात असताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत या सोमवारी अचानक ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाल्यानंतर त्यांची ईडी अधिकाऱ्यांनी 4 तास चौकशी केली. मात्र वर्षा राऊत ह्या माध्यमांना चकवा देत कार्यालयात आल्या व परतल्या. 5 जानेवारी रोजी ईडीकडून वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्या अगोदर 4 जानेवारी रोजी वर्षा राऊत अचानक ईडी कार्यालयात जाऊन चौकशीसाठी सामोरे गेल्या होत्या. दरम्यान 5 जानेवारी रोजी वर्षा राऊत या ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याचे सूत्रांकडून कळत आहे.
काय आहे प्रकरण
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना पीएमसी बँकेकडून 95 कोटी रुपयांचे कर्ज हे कुठल्याही योग्य कागदपत्रांची पूर्तता न करता पुरविण्यात आल्याचे तपासात समोर आलेले होते. या 95 कोटी पैकी जवळपास 1 कोटी 6 लाख रुपये प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी यांच्या खात्यामध्ये वळते केले होते. या 1 कोटी 6 लाख पैकी तब्बल 55 लाखांची रक्कम दोन टप्प्यात बिनव्याजी कर्ज स्वरूपात वर्षा राऊत यांना देण्यात आलेली होती. डिसेंबर 2010 मध्ये 50 लाख , 2011 मध्ये पाच लाख अशा दोन टप्प्यात 55 लाख रुपये बिनव्याजी कर्ज म्हणून वर्षा राऊत यांना माधुरी राऊत यांच्याकडून मिळाले असल्याचे तपासात समोर आलेले आहे. या 55 लाखांचा वापर वर्षा राऊत यांच्याकडून दादर पूर्व येथील फ्लॅट विकत घेण्यासाठी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ईडीच्या नोटीस नंतर काय म्हणाले होते राऊत
आम्ही कोणालाही घाबरत नाही. हिम्मत असेल तर समोरासमोर लढा, असे संजय राऊत म्हणाले होते. ईडीची नोटीस म्हणजे ब्रह्वाक्य नाही, असेही ते म्हणाले. भाजपा विरोधकांना त्रास देण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर करत आहे. वैफल्य, हतबलता यातून ही कारवाई करण्यात आली आहे. ईडी हा भाजपचा पोपट आहे, असेही ते म्हणाले. ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. तुम्हाला जे उखाडायचं आहे. ते उखाडा मी घाबरत नाही, असे ते म्हणाले. मुलांबाळावर हल्ले करणाऱ्यांना नामर्द म्हणतात. असा नामर्दपणा कोणी करत असेल. तर त्यांना शिवसेना त्याच पद्धतीने उत्तर देईल. बायकांच्या पदराआडून खेळी खेळण्यात येत आहे. ही खेळी त्यांच्यावर उलटणार आहे, असे राऊत म्हणाले. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं आहे की मैदानात मुलांना बायकांना आणायचे नाही, असेही राऊत म्हणाले.