मुंबई- शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली असून ही मुलाखत शनिवारी पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी या मुलाखतीचा एक टीझर संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. दरम्यान, या मुलाखतीबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
संजय राऊत यांनी शरद पवार यांची जी मुलाखत घेतली आहे, ती तीन भागात दाखवली जाणार आहे. शनिवारी याचा पहिला भाग दाखवला जाणार असून यापूर्वी राऊत यांनी एक ४४ सेंकदाचा टीझर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी 'एक शरद, सगळे गारद' असे कॅप्शन दिले आहे.
टीझरमध्ये शरद पवार यांनी कोरोना, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावा लागलेला लॉकडाऊन, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यासोबतच राम मंदिर आंदोलनासारख्या संवेदनशील विषयावरही प्रश्न विचारण्यात आले आहेत. याशिवाय मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात जवळपास महिनाभर सत्तासंघर्ष सुरू होता. त्यात स्वत: शरद पवार किंगमेकर ठरले. त्यावेळी झालेल्या राजकारणावरही पवार यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत.