मुंबई -हाथरसमधील पीडितेच्या शरिराची जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही विटंबना झाली आहे, तेव्हा पंतप्रधानांनी जनतेला सत्य सांगावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. हाथरसच्या घटनेमुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे, असेही ते म्हणाले. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत हाथरसच्या घटनेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
हाथरसप्रकरणी प्रसार माध्यमांनी सत्य समोर आणायला हवे. पत्रकारांना घटनास्थळी जाऊ दिले पाहिजे. मध्यरात्री २ वाजता रात्रीच्या काळोखात मुलीचा मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्यात आला. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. कुणाला हे अंत्यसंस्कार वाटत असतील तर त्यांनी हिंदू धर्माचे ग्रंथ आणि पोथ्या वाचाव्यात. अंत्यसंस्काराबाबत आपल्या धर्मात काही वचने आहेत, मार्गदर्शन आहे. हिंदुत्ववादी सरकारने या पोथ्या वाचाव्यात, असा टोलाही त्यांनी योगी सरकारला लगावला. योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालतात, ते संन्यासी आहेत. गेल्याच महिन्यात त्यांनी आणि पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात सीतामाईची पूजा केली. सीतामाईही हाथरसच्या कन्येच्या किंकाळ्या ऐकून व्यथित झाली असेल. पुन्हा धरणी दुभंगून मला पोटात घ्या म्हणत असेल. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि राजस्थान या चार राज्यात गेल्या काही महिन्यात १७ हजार सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्याचा दावाही त्यांनी केला.