मुंबई - पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि आसाममध्ये निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने आपली सर्व ताकद लावली आहे. मात्र, ममता बॅनर्जी या बंगालच्या वाघिण आहेत आणि त्या एकट्याच सर्वांना पुरून उरतील, अशी खात्री राऊत यांनी व्यक्त केली आहे.
बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधील निवडणुका देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. देश भविष्यात कोणत्या बाजूला जाणार हे या निवडणुका ठरवणार आहेत. एक वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की महाभारतात एकवीस दिवस युद्ध चालले होते. कोरोनाचे युद्ध 18 दिवसात संपेल. मात्र, अजूनही कोरोना कायम आहे. असे असताना मोदी सरकारने ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी एक नवीन महाभारत सुरू केले आहे, अशी टीका राऊत यांनी केली. नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
ममतांच्या पत्रावर विचार करू -
भाजपच्या काळात देशातील लोकशाहीवर नेहमी आघात होत आले आहेत. याला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे पत्र ममता बॅनर्जी यांनी लिहले आहे ही खरी गोष्ट आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मजबूत संघटन बनवले पाहिजे, असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. याबाबत आम्ही नक्कीच विचार करू, असे संजय राऊत म्हणाले.