मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकारवर ईडीमार्फत कारवाईचे धाड सत्र सुरू आहे. ईडीचा राजकीय वापर करण्यात येत आहे. ईडी हे भाजपचे उपकार्यालय आहे, असा घणाघात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी चढवला. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेनेला बदनाम करण्याचे कट कारस्थान असल्याचे सांगत, सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
ईडीची चौकशी
शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील ९०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. भाजप आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीमार्फत चौकशी केली जात आहे. आज शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी पोहचले. तब्बल ४ तासांहून अधिक काळ अडसूळ यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान आनंद अडसूळ यांची तब्येत बिघडल्याने गोरेगाव येथील लाईफ लाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ईडीच्या कारवाईनंतर शिवसेना नेत्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.
ईडी हे भाजपचे उपकार्यालय
यंत्रणांचा राजकीय वापर सुरू आहे. ईडीचा राजकीय वापर करण्यात येत आहे. ईडी हे भाजपचे उपकार्यालय आहे, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना न्याय मिळाला पाहिजे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेसोबत इतर बँकांचे बोला. शिवसेनेला बदनाम करण्याचे कारस्थान करण्यात येत आहे. अनिल परब हे ईडीच्या चौकशीला सामोरे जातील त्यांच्यात ती क्षमता आहे. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात देशातील भ्रष्टाचाराचा कळस आहे तिथे त्यांची सत्ता आहे. त्यामुळे तिथे कारवाई होत नाही, असेही सावंत म्हणाले.