मुंबई Shiv Sena MlA Disqualification Case : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी करत राज्यात भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत सुरू असलेल्या सुनावणीचा निकाल येत्या १० जानेवारीला येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हा निकाल सुनावणार असून दोन्ही बाजूच्या वकीलांसमोर हा निकाल सुनावला जाणार आहे. या निकालाकडं राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या आमदारांना निकाल आपल्याच बाजूनं लागेल अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडं आमदार अपात्र प्रकरणी झालेल्या सुनावणीच्या संपूर्ण घटनाक्रमाकडं पाहिलं असता उद्धव ठाकरे गटाला त्यांच्याबाजूनं निकाल लागेल ही अपेक्षा फार कमी आहे. निकाल विरोधात गेल्यास उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार: शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी काहीच दिवसांपूर्वी पूर्ण झाली असून या प्रकरणाचा निकाल येत्या १० जानेवारीला येण्याची शक्यता जास्त आहे. निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दोन्ही गटांच्या वकिलांना समोरा-समोर बोलावून हा निकाल घोषित करणार आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, यापैकी नेमका कुणाला दिलासा मिळणार? याकडं संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. अशात शिंदे गटाच्या अनेक आमदारांच्या मते सध्या विधिमंडळातील बहुतमताच्या आधारे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह हे शिंदे गटाला दिलं होतं. त्याच पद्धतीनं आता विधानसभा अध्यक्ष देखील निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेत आपला निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नार्वेकरांकडून फार अपेक्षा नाही : या निकालाबाबत बोलताना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, महाभारतामध्ये पांडवांची संख्या कमी होती तर कौरवांची संख्या जास्त होती. शकुनी मामाचे फासे जोपर्यंत कुटनीतीने कौरवांच्या बाजूने पडत होते, तोपर्यंत कौरव जिंकत होते. परंतु प्रत्यक्षात कुरुक्षेत्रावर लढाई सुरू झाली तेव्हा संख्येने कमी असलेले पांडव जिंकले. कारण तेव्हा शकुनीचे फासे चालत नव्हते तिथे ध्येय आणि शौर्याची परीक्षा होती. आताचा काळ जर बघितला तर ईडी, सीबीआय किंवा विधानसभा अध्यक्षपद हे सर्व शकुनीचे कुटनीतीने फासे टाकणारे लोक आहेत. त्यामुळं असे फासे टाकताना काय परिणाम होणार आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. त्यामुळं आम्ही नार्वेकरांकडून फार अपेक्षा ठेवली नाही. किंबहुना आम्हाला बिलकुलच अपेक्षा नाही.
महाराष्ट्रातील जनता ही हतबल दामिनी :निवडणुकीच्या कुरुक्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा उतरू तेव्हा ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशनचे फासे चालणार नाहीत. तेव्हा उद्धव ठाकरे यांचं धैर्य तसेच तमाम शिवसैनिकांचे शौर्य हे कामाला येणार आहे. त्या रणनितीमध्ये निवडणुकीच्या कुरुक्षेत्रामध्ये ज्यांना तुम्ही शिल्लक सेना म्हणून हिणवत आहात ती शिवसेना तुम्हाला जिंकलेली दिसेल. जर या प्रकरणांमध्ये नार्वेकर यांना न्याय करायचा असता तर सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर सुद्धा त्यांनी हे प्रकरण टोलवत ठेवलं नसतं. न्यायाला ज्या पद्धतीने त्यांनी उशीर केला आहे. तो एका अर्थी अन्याय करण्यासारखाच आहे. सरकारचं शेवटचं अधिवेशन सुद्धा त्यांनी काढून घेतलं. त्यामुळं आता पात्र झाले किंवा अपात्र झाले, तरी काही फरक पडत नाही. कारण २२ जानेवारी राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आचारसंहितेचा खेळ सुरू होणार आहे. त्यांनी अपात्र केलं तरी काही फरक पडणार नाही कारण त्यांनी त्यांची टर्म पूर्ण काढली आहे. नार्वेकर हे दामिनी चित्रपटातील चड्डा असून महाराष्ट्रातील जनता ही हतबल दामिनी आहे. जी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केलीय.