मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरीकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदरी घ्या, असे आवाहन केले होत. तसेच, नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, असे वागू नका, असे ते म्हणाले होते. मात्र, त्यांच्याच पक्षातील नेते नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. घाटकोपर येथे आधुनिक टॉयलेटचे उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. त्याबरोबरच लहान मुलांनादेखील या कार्यक्रमात सहभागी करण्यात आले होते. तिसऱ्या लाटेचा धोका असताना अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांना फक्त गुलाब देण्यासाठी लहान मुलांना आणणे कितपत योग्य होते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
मुलांना कार्यक्रमात जमा करणे कितपत योग्य?
घाटकोपर (पश्चिम) मधील जगदुशा नगर येथे सार्वजनिक-खासगी सहभागातून निर्मित, पर्यावरणस्नेही असे दुमजली सुविधा समुदाय केंद्र उभारण्यात आले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते व मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली या केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोठा गाजावाजा स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. आदित्य यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. विभागातील लहान मुलांना या ठिकाणी जमा करण्यात आले होते. अकरा ते साडेबारा पर्यंत 25 पेक्षा जास्त लहान मुले या ठिकाणी उपस्थित होती. ही सर्व मुले 11 वर्षाखालील होती. ही मुले तिथपर्यंत उभी होती. जेव्हा आदित्य ठाकरे आले. तेव्हा या मुलांनी त्यांना गुलाबाची फुले दिली. मात्र, एकीकडे उद्धव ठाकरे नागरिकांना गर्दी करू नका, असे आवाहन करतात दुसरीकडे त्यांचे पदाधिकारी लहान मुलांना या कार्यक्रमात जमा करतात, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.