महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 30, 2020, 9:47 AM IST

Updated : Mar 30, 2020, 9:56 AM IST

ETV Bharat / state

पार्श्वभागावर दंडुका मारणे ही समाजसेवा अन् आरोग्यसेवाच, फडणवीसांना सुनावले

कोरोनाशी लढण्यासाठी अनेक उद्योगपतींनी मदत दिली. महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदारांनी (भाजप वगळून) आपले एक महिन्याचे वेतन देत आहे. पण, भाजपवाले भाजपा राहत कोषात मदत निधी देत आहेत. म्हणजे अशा संकटाच्या काळातही विरोधी पक्षाने त्यांचा सवतासुभा केला, अशी टीका त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई- सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. अशातच लॉकडाऊनच्या परिस्थितीत विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिसांच्या काठीचा मार खावा लागल्याची माहिती समोर आली होती. यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. त्यावरून शिवसेनेने आता निशाणा साधला आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे, असे म्हणत शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा. प्रमुख विरोधक असलेल्यांनीच आता मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. त्यामुळे अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावरही एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, असाही टोला लगावत शिवसेनेने भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना काय झाले आहे? जणू जनतेची काळजी फक्त त्यांनाच आहे आणि सरकार फक्त हाती दंडुका घेऊन फिरत आहे, अशी विधाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत आहेत. आधीच्या राजवटीत पोलिसांचा फक्त गैरवापर सुरू होता. आज फक्त कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा वापर सुरू आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभर जणांना, अन् त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे.

महाराष्ट्र वाचविण्याचे टीकाकरांनी मार्गदर्शन करावे

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशेच्या घरात गेला आहे. हे लक्षण चांगले नाही. राज्यात दोनशे व संपूर्ण देशात हजारांवर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. पण, लोकांना या महामारीचे गांभीर्य खरंच समजले आहे काय? कोरोनाची समस्या अशी आहे की दाबण्यासाठी हिंदू-मुसलमान असा खेळ करूनही उपयोग नाही. मंदिर, मशीद, शाहीन बाग वगैरे पत्ते पिसूनही कोरोनावरील मात शक्य नाही. येथे सरकारला कष्ट करावे लागतील व जनतेला स्वयंशिस्त पाळावी लागेल. सरकारने २१ दिवसांचे `लॉक डाऊन’ जाहीर करूनही लोक रस्त्यावर उतरतात, गर्दी करतात. पुन्हा पोलिसांनी दंडुके उगारले तर हे कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न विचारतात. होय, हे कायद्याचेच राज्य आहे. म्हणूनच पोलीस फक्त दंडुक्याचा वापर करीत आहेत. चीनसारखे राष्ट्र असते तर काय झाले असते सांगता येत नाही. रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस दंडुके मारतात म्हणून सरकारवर टीका केली जात आहे. मग महाराष्ट्र वाचविण्यासाठी काय करायला हवे, याचेही मार्गदर्शन टीकाकारांनी करावे. इराणमध्ये रस्तोरस्ती, इटलीच्या चौकाचौकांत कोरोना रुग्णांचे मुडदे पडत आहेत. तसे मुडदे येथील रस्त्यांवरही पडू द्यायचे काय? डॉक्टरांवर ताण आहे, तसा पोलिसांवरही आहे.

विरोधी पक्षाचा सवतासुभा

कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर टीकेची झोड उठवून तुम्ही कोरोनाला बळ देत आहात. पण, घसरलेल्या गाडीत बसणाऱया विरोधकांना हे सांगायचे कोणी? महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदारांनी (भाजप वगळून) त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री मदतनिधीत जमा केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी टाटा, बजाज, अझिम प्रेमजी, अंबानी अशा उद्योगपतींनी मोठे योगदान दिले. पण, राज्यातील विरोधी पक्षाने त्यांच्या आमदार-खासदारांसाठी काय फर्मान काढावे? तर त्यांचे एक महिन्याचे वेतन त्यांनी भाजपच्या राहत कोषात जमा करायचे आहे. म्हणजे अशा संकट काळातही विरोधी पक्षाने त्यांचा सवतासुभा केला आहे. संकटात हे लोक एकत्र येण्यास तयार नाहीत. त्यांना मुख्यमंत्री व त्यांचा मदतनिधी आपला वाटत नाही. अशा विरोधी पक्षाला सामाजिक भान तर नाहीच, पण त्यांचे वागणे राष्ट्रीय एकोप्याच्या विरोधी आहे. म्हणूनच अशा कठीणप्रसंगी असे संकुचित विचारांचे लोक सत्तेवर नाहीत याचा महाराष्ट्राला अभिमान आहे.

Last Updated : Mar 30, 2020, 9:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details