महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, शिवसेनेचा काँग्रेसला टोला - औरंगाबाद नामांतर न्यूज

औरंगाबादच्या नामांतराला सातत्याने काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात असून, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून काँग्रेसला टोला लगावला आहे. यात जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे.

shiv sena criticize congress aurangabad sambhajinagar name change
औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, शिवसेनेचा काँग्रेसला टोला

By

Published : Jan 17, 2021, 10:51 AM IST

Updated : Jan 17, 2021, 11:21 AM IST

मुंबई - मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे. अशात औरंगजेब सेक्युलर असल्याचा युक्तीवाद काँग्रेसकडून करण्यात आला. तर दुसरीकडे नामांतरावरून भाजपाही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. नामांतराला सातत्याने काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात असून, अशात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून काँग्रेसला टोला लगावला आहे. यात जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे.

संजय राऊत बोलताना...

काय म्हटलं आहे आजच्या सामना रोखठोकमध्ये

औरंगजेब हा 'सेक्युलर' वगैरे अजिबात नव्हता. तो मोगल शासक आणि आक्रमक होता. बाबराने जे अयोध्येत केले तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. औरंगजेबाच्या आदेशावरून महाराष्ट्राचे राजे छत्रपती संभाजी यांना मोगल सरदारांनी हाल हाल करून मारले व त्यांचा छिन्नविच्छिन्न देह पुण्याजवळच्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत फेकून दिला. शहाजहान हा औरंगजेबाचा बाप. बापाने त्याला 1657 साली दक्षिणेत पाठवले. विजापूर, गोवळकोंड राज्यांवर स्वाऱया करून औरंगजेबाने हाहाकार माजवला. दौलताबादपासून जवळच खडकी येथे त्याने 'औरंगाबाद' शहर वसवलं. औरंगजेब क्रूर आणि धूर्त होता. बादशाही मिळवण्यासाठी त्याने आजारी बापाला कैद केले. सख्ख्या भावांचा खून केला. औरंगजेब हा एक कर्मठ सुन्नी मुसलमान होता. तो परधर्मद्वेष्टा होताच, पण हिंदूंचा कडवट दुश्मन होता. अनेक तऱ्हेचे कर लावून त्याने हिंदूंचा भयंकर छळ केला. 1669 मध्ये त्याच्याच हुकमाने मथुरेतील केशवदेवाचे हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. मंदिर पाडून मशिदी बांधण्याचा त्याला छंदच जडला होता, असे राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी औरंगजेबचा रक्तरंजित इतिहास वाचावा

महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा 'सेक्युलर' वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. माझ्या राज्यात लाचलुचपत म्हणजे भ्रष्टाचार चालणार नाही असे तो बरळत असे, पण स्वतः औरंगजेब हा पैसे घेऊन पदव्या आणि सरदारक्या बहाल करीत असे. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी. औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान, पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, हे वागणं 'सेक्युलर’ नव्हे,' असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसला टोले लगावले आहेत.

Last Updated : Jan 17, 2021, 11:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details