मुंबई - सावरकरांच्या मुद्यावरुन काल (बुधवार) विधीमंडळाच्या सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार गोंधळ झाला. भाजपने सावरकरांचा गौरव प्रस्ताव सभागृहात मांडला होता. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी तो फेटाळून लावला. यावरुन भाजपने शिवसेनेसह सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. सत्तेसाठी एवढी लाचार शिवसेना कधीही बघीतली नसल्याची टीका भाजपने केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेनेने मुखपत्र सामनातून उत्तर दिले आहे.
भाजप सावरकरांची ढाल करुन नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळत असून, त्यांचा सावरकर पुळका हा खोटा असल्याचे सेनेने म्हटले आहे. तर स्वातंत्र्यचळवळीत भाजप किंवा संघ कोठे होता? असा सवाल करत भाजपसह संघावरही सेनेने निशाणा लगावला आहे.
सावरकरांच्या नावाने भाजपचे राजकारण
सावरकरांच्या मुद्यावरुन सरकारची कोंडी होईल, शिवसेनेसमोर पेच निर्माण होईल, असे भाजपला वाटत आहे. मात्र, ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर कोणताही पेच निर्माण होणर नाही. मात्र, भाजपने जे ढोंग केले आहे, त्या ढोंगाच्या पेकटात लाथ नक्कीच बसेल असे सेनेने म्हटले आहे. सावरकर हा भाजपसाठी आत्ता श्रद्धेचा विषय राहीला नसून, राजकारणासाठी सावरकरांचा वापर केला जात असल्याचा आरोप सेनेने भाजपवर केला आहे.
जे स्वत:च कोंडीत सापडले ते आमची कोंडी काय करणार
सावरकराच्या पुण्यदिनी त्यांचे स्मरण सगळ्यांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग जे आज करत आहेत, त्यांना खरेच सावरकर कळले काय? अशा सवाल सेनेने भाजपला केला. भाजप म्हणते सावरकरांच्या विषयावर कोंडी करु, पण जे स्वत:च कोंडीत सापडले आहेत ते दुसऱ्यांची काय कोंडी करणार, असा टोला सेनेने लगावला आहे.
केंद्र सरकारने सावरकरांसाठी काय केले?
महाराष्ट्र सरकारची कोंडी करण्यापेक्षा केंद्र सरकारने सावरकरांचा काय सन्मान केला. यावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित करायला हवेत, असे सेनेने म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनी मोदी सरकराने सावरकरांना भारतरत्न का जाहीर केला नाही? असा सवालही सेनेने केला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मोदींना सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी २ पत्रे लिहिली. त्या पत्राचे पुढे काय झाले? त्या पत्रांची दखल घेतली नाही हा महाराष्ट्राचा आणि सावरकरांचा अपमान असल्याचेही सेनेने म्हटले आहे.
स्वातंत्र्यचळवळीत भाजप किंवा संघ कोठे होता?
स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांचे योगदान मोठे होतेच. पण स्वातंत्र्यचळवळीत भाजप आणि तेव्हाचा संघ परिवार कोठे होता? असा सवाल करत सेनेने भाजपसह संघावरही निशाणा लगावला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही संघाने तिरंगा मानला नाही. तिरंगी कधीही संघ कार्यालयावर फडकला नसल्याचे सेनेने म्हटले आहे. सरदार वल्लभाई पटेल यांनी संघावर दोन वेळा बंदी आणली होती. दोन्ही वेळेला बंदी उठवताना पटेल यांनी एक अट घाचली होती. ती म्हणजे तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल. ही गोलवलकर गुरुजींनी मान्य केली. पण २००२ पर्यंत स्वत: ला राष्ट्रवादी म्हणून घेणाऱ्या संघटना राष्ट्रध्वज फडकवायला तयार न्वहत्या असे सेनेने म्हटले आहे. सावरकरांची ढाल करुन भाजप राजकारण करु पाहत आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर पेच निर्माण होईल, असे त्यांना वाटत असेल मात्र, ते भ्रमात असल्याचे सेनेने म्हटले आहे.