महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray : आमच्या विरोधात कारस्थानं करूनही आम्ही जिंकलो - उद्धव ठाकरे

Andheri Bypoll Result: आमच्या विरोधात कारस्थानं करूनही आम्ही पोटनिवडणूक जिंकली. आमच्या विजयाची सुरुवात आहे. आमचे नाव आणि चिन्ह गोठवले गेले, ज्यांच्यामुळे आमच्या पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठले त्यांच्याबद्दल बोलणे मूर्खपणाचे आहे.

By

Published : Nov 6, 2022, 7:08 PM IST

Updated : Nov 6, 2022, 8:01 PM IST

Andheri Bypoll Result
Andheri Bypoll Result

मुंबई: आमच्या विरोधात कारस्थानं करूनही आम्ही पोटनिवडणूक जिंकली. आमच्या विजयाची सुरुवात आहे. आमचे नाव आणि चिन्ह गोठवले गेले, ज्यांच्यामुळे आमच्या पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठले त्यांच्याबद्दल बोलणे मूर्खपणाचे आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ऋतुजा लटके यांनी अंधेरी पोटनिवडणूक विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणुकीत भरघोस मतांनी विजय - राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन गट झाले आहे. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) असे दोन गट निर्माण झाले. यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे गटासाठी पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत शिंदे गटाने आपला उमेदवार दिला नव्हता. जरी या निवडणुकीत समोर तुल्यबल्य उमेदवार नसला तरी, सुद्धा धनुष्यबाणा ऐवजी नवीन भेटलेले मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं व त्यात ते यशस्वी झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाला आहे. ऋतुजा लटके यांना ६६५३० मते भेटली. तर त्यांच्या पाठोपाठ नोटाला १२८०६ मतदारांनी पसंती दर्शवली आहे.

पती पेक्षा जास्त मते - ऋतुजा लटके यांनी ६६५३० मते घेऊन केवळ बहुमतच नव्हे, तर त्यांचे दिवंगत पती रमेश लटके यांचा विक्रमही मोडला आहे. रमेश लटकेंपेक्षा जास्त मते मिळवून ऋतुजा यांनी विजय मिळविला आहे. रमेश लटके हे अंधेरी पूर्वचे दोनवेळा आमदार होते. २०१४ मध्ये लटकेंना ५२८१७ मते मिळाली होती. तर २०१९ मध्ये ६२७७३ मते मिळाली होती. आज ऋतुजा लटकेंनी पतीला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते मिळविली आहेत.

३७४७ मते जास्त -रमेश लटकेंना २०१९ च्या निवडणुकीत ६२,७७३ मते मिळालेली. अपक्ष मुरजी पटेल यांना ४५,८०८ मते मिळाली होती. काँग्रेसच्या अमीन कुट्टी यांना २७,९५१ मते मिळाली होती. तर नोटाला ४३११ मते मिळालेली. ऋतुजा लटके यांनी यंदा त्यांचे पती रमेश लटके यांच्या पेक्षा ३७४७ मते जास्त घेतली आहे.

अखेरचा निकाल - ऋतुजा लटके व इतर ६ उमेदवार तसेच नोटा ला 19 फेरी अखेर मिळालेली अंतिम मते. ऋतुजा लटके- ६६५३०, बाळा नाडार- १५१५, मनोज नायक- ९००, नीना खेडेकर- १५३१, फरहाना सय्यद- १०९३, मिलिंद कांबळे- ६२४, राजेश त्रिपाठी- १५७१, नोटा- १२८०६, अवैध्य मते- २२, एकूण- ८६५७ शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवून केलेल्या कपट कारस्थानानंतर झालेल्या पहिल्या पोट निवडणुकीत मशाल भडकली आणि भगवा फडकला. मला याचा सार्थ अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचे सर्व श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचे आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिली.

ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला -अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाल्यानंतर त्या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या. यावेळी ठाकरे यांनी पत्रकार घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि शिंदे गटावरही ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, रश्मी ठाकरे यांनी ऋतुजा लटकेंचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या.

ठाकरेंचा विश्वास -मधल्या कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचे चिन्ह आणि नाव गोठवलं गेले. मशाल निशाणी घेऊन आम्ही लढलो. मशाल भडकली आणि भगवा फडकला. लढाईची सुरुवातच विजयाने झालीय. त्यामुळे मला भविष्यातील लढाईची चिंता राहिलेली नाही. या निवडणुकीत जसे एकजुटीने हा विजय आपण खेचून घेतला तसेच पुढचा सगळा विजय खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. नोटाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आमचे नाव आणि चिन्ह गोठवले होते. ज्यांच्या मागणीवरुन गोठवले ते या निवडणुकीच्या रिंगणात आजुबाजूलाही नव्हते. मात्र त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी प्रथम अर्ज भरला. पण अंदाज आल्यानंतर माघार घेतली. जर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक निवडणूक लढवली असती तर ही मतं त्यांना मिळाली असती. नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

फडणवीस यांची खरडपट्टी काढली - देवेंद्र फडणवीस यांच्या उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला या प्रश्नांवर ठाकरेंनी चांगलेच वाभाडे काढले. लोकांसमोर सर्व घडले आहे. आता कोण काय बोलतेय, यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे लोक पाहत आहेत. हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नसून उघड्या डोळ्यांनी पाहणारा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि महाराष्ट्रात फरक आहे. कोणी काही बोलले तरी जनता उघड्या डोळ्याने पाहत असल्याचे सांगत फडणवीस यांची खरडपट्टी काढली. आशिष शेलार यांच्यावर भाष्य करण्यास नकार देत, त्यांना महत्त्व देत नसल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. सर्वजण एका वेगळ्या लढाईच्या तयारीत होते. विरोधकांनी माघार घेतल्यानंतर उत्साहावर थोडं पाणी पडले, पण तरीही मशाली भडकल्याचे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले.

महाराष्ट्राबद्दलचे प्रेम उफाळून -आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार हालचाली करते. आता गुजरातच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. पंतप्रधानांच्या तोंडातून आता अचानक महाराष्ट्राबद्दलचे प्रेम उफाळून येत आहे. त्यामुळे प्रकल्प जाहीर केले जात आहेत. मात्र, त्यांच्या या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात, असा माझा अंदाज असल्याचे ठाकरेंनी म्हणाले. गुजरातमधील निवडणुकीसाठी काही इच्छुक आले आहेत. पण आम्ही ही निवडणूक संपूर्ण ताकद लावणार नसल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. तसेच गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत आपण सहभागी होऊ का नाही हे नक्की नाही, पण आपले नेते सहभागी होणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले.

Last Updated : Nov 6, 2022, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details