मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. या दोन्ही महापुरुषांच्या जयंत्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मार्फत साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना लोकल सबर्बन ट्रेन चालवणाऱ्या मोटरमन आणि मोटार मॅनेजर यांच्यामार्फत सुंदर असा देखावा दरवर्षी केला जातो. हा देखावा पाहण्यासाठी कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तसेच रेल्वे प्रवासी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
काय आहे देखावा?सीएसएमटी रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवजयंती निमित्त रायगड किल्ल्याचा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले असून त्यांच्या हातात भवानी तलवार आहे. बाजूला शिवाजी महाराजांसोबत सुराज्यासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनासमोर एक पालखी ठेवण्यात आली आहे. देखाव्याच्या बाजूलाच लागून आणखी एक स्टेज उभारण्यात आला आहे. यावर शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि गाणी सादर केली जात आहेत.
देखावा बनला 'सेल्फी पॉईंट':सीएसएमटी रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेला देखावा पाहण्यासाठी रेल्वे कर्मचारी त्यांचे कुटुंबीय तसेच प्रवाशांनी गर्दी केली होती. या देखाव्यासमोर रेल्वे कर्मचारी त्याचे कुटुंबीय तसेच प्रवासी विविध पोज देऊन सेल्फी काढताना दिसत होते. विशेष म्हणजे, हा देखावा आजच्या दिवशी सेल्फी पॉईंट झालेला दिसत होता. यामुळे देखाव्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती.
शिवाजी महाराजांना अभिवादन:रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. दादर शिवाजी पार्क येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (प्र.सु.र.व.का) सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजधानी दिल्लीत उत्साहात साजरी करण्यात आली. बाल शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवी पाळण्याने, ढोल-ताशांच्या गजराने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या उत्स्फुर्त घोषणांनी महाराष्ट्र सदन दुमदुमले होते. कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा गायला. यानंतर पालखी पूजन करण्यात आले.
हेही वाचा:Court News : घराचा ताबा न देणे पडले महागात; विकासकाला सहा महिन्यांचा तुरुंगवास