मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या दालनात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अशातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांच्या मनधरणीसाठी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचे संगण्यात आले होते. त्यानुसार, आमदार मंत्री दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ही बैठक झाली. बैठकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेची आगामी रणनीती ठरवण्यावर चर्चा करण्यात आल्याचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
५०० दवाखाने सुरू करणार : मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार, संपर्क प्रमुखांची अंगीकृत संघटनांची आज बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा, तालुका स्तरावर कार्यालय सुरू करावे. गाव तेथे शाखा, शाखा तिथे शिवसैनिक ही संकल्पना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे दर आठवड्याला मंत्र्यांनी जनता दरबार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, येत्या (दि. 9 फेब्रुवारी)रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे ग्रामीण भागात या दिवशी ५०० दवाखाने सुरू करणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.