मुंबई पालिकेतील शिवसेना कार्यालयात शिंदे गटातील कार्यकर्ते मुंबई : मुंबई पालिकेवर गेले पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. मात्र शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात ( BMC Shiv Sena office ) माजी नगरसेवकांची उठबस कमी होती. याचा फायदा घेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने या कार्यालयावर कब्जा ( Shinde group occupied BMC Shiv Sena office ) मिळवला आहे. यामुळे येत्या काही दिवसात मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना पक्ष कार्यालय : मुंबई महापालिकेचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपला त्यानंतर पालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. याच दरम्यान शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी फूट पाडली. कालांतराने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे पक्ष कार्यालय आहे. या कार्यालयात शिवसेनेचे माजी नगरसेवक फिरकतच नव्हते. एखाद्या अपवादत्मक परिस्थितीमध्ये काही नगरसेवक या कार्यालयात येत होते. मात्र आज बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून या कार्यालयावर कब्जा करण्यात आला आहे.
कार्यालयावर कब्जा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे संसदेतील गटनेते राहुल शेवाळे, उपनेते यशवंत जाधव, उपनेत्या व प्रवक्त्या शितल म्हात्रे आणि विभागप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये पालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर या सर्वांनी आपला मोर्चा पक्ष कार्यालयाकडे वळवला. पक्ष कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोणीही माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे आम्हाला कोणीही पक्ष कार्यालयात जाण्यापासून रोखलेले नाही. आम्ही या कार्यालयावर कब्जा मिळवला असे बोलू शकता, असे शितल म्हात्रे यांनी सांगितले.
वाद वाढण्याची शक्यता : मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या पक्ष कार्यालय मध्ये काही दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे माजी नगरसेवकांनी येऊन बसायला सुरुवात केलीच होती याच दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून या कार्यालयाचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हा वाद आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.