मुंबई :२०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पूर्णपणे कंबर कसली आहे. विशेषतः कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पूर्ण तयारीनिशी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात उतरली आहे. याच अनुषंगाने राज्यामध्ये सुद्धा लोकसभेसाठी भाजपने 'मिशन ४५' अभियान हाती घेतले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर शिंदेंसोबत आत्ताच्या घडीला १३ खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २५ जागा लढवून २३ जिंकल्या तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने २३ लढवून १८ जागा जिंकल्या होत्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने १९ जागा लढून ४ जागेवर विजय मिळविला होता. तर काँग्रेसने २५ जागा लढून त्यांना अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता.
भाजप - शिवसेना शिंदे गट युती :२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून २२ जागांची मागणी केली जाऊ शकते. २०१९ मध्ये शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. मागच्याच महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांची बैठक घेऊन त्याबाबत आढावा घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या १३ खासदार आहेत. तर शिवसेनेचे उर्वरित ५ खासदार हे ठाकरे गटासोबत असल्याने त्याही जागांबाबत एकनाथ शिंदे आग्रही आहेत. भाजप - शिवसेना शिंदे गट युतीमध्ये कुठलीही अडचण नसून समन्वयाने काम केले जात आहे. समन्वयानेच जागावाटप होईल. त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी सांगितले असले तरी सुद्धा जागावाटप हा युतीसाठी फार महत्त्वाचा विषय असणार आहे.
भाजपमध्ये चिंता :लोकसभेसाठी मिशन ४५ साठी भाजपने पूर्णपणे कंबर कसली आहे. त्याचा आढावा सर्वच मतदारसंघांमध्ये घेतला जात आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे गटाला २२ जागा कशा द्यायच्या? याची चिंता भाजपमध्ये राज्यापासून केंद्राला पडलेली आहे. याच अनुषंगाने भाजपने शिवसेनेच्या (शिंदे गट) १३ खासदारांच्या मतदारसंघावर संयोजक नियुक्त केले आहेत. या मतदारसंघांमध्ये मोदी@९ अंतर्गत जनसंपर्क अभियान सुद्धा सुरू केल्याने एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपच्या या प्लान बीवरून शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे.