मुंबई :शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत प्रवक्ते असलेल्या म्हात्रेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला नेत्याची जबाबदारी सोपवली. ठाकरे गटातून होणाऱ्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे काम म्हात्रे करत होत्या. युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे देखील म्हात्रे यांच्या टीकेतून सुटले नाहीत. शिवसेना शिंदे गटात आक्रमक महिला नेत्या म्हणून शितल म्हात्रेनी नावलौकिक होत्या. अल्पावधीतच त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती म्हणून नावारूपाला आल्या. शिंदे गटाचे प्रत्येक कार्यक्रमाची जबाबदारी शितल म्हात्रेंवर सोपवली जाऊ लागली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शितल म्हात्रेंना बाजूला करण्याच्या हालचाली शिवसेनेत सुरू झाल्या आहेत.
काय आहे कारण :शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा दहिसर येथील आशीर्वाद यात्रेतील एक वादग्रस्त व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. व्हिडिओ बदनामीसाठी तयार केल्याचा आरोप, शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर केला. दहिसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली. दरम्यान, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने केलेल्या फेसबुक व्हिडिओ लाईव्हवरून हा उचलल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी नेमली. या चौकशीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. मात्र, शीतल म्हात्रेंच्या या वादग्रस्त व्हिडिओमुळे शिवसेना शिंदे गटाची मोठी नाचक्की झाली आहे. पक्षांतर्गतही म्हात्रेंना, विरोध आहे. त्यामुळे शितल म्हात्रेंना प्रसिद्धीपासून थोडं बाजूला ठेवण्याच्या सूचना वरिष्ठांनी केल्याचे समजते. शिंदे गटातील एका पदाधिकाऱ्याने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.