मुंबई -शीना बोरा हत्याकांडातील ( Sheena Bora Case ) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने ( Indrani Mukherjee ) सोमवार (दि.24 जानेवारी) रोजी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात ( CBI Court ) अर्ज दाखल केला आहे. सीबीआय या तपास यंत्रणेने तिच्या पत्रावर काय कारवाई केली हे जाणून घेण्यासाठी अर्ज केला. ज्या अर्जात नोव्हेंबरमध्ये शीना बोरा जम्मू-काश्मीरमध्ये जिवंत असल्याचा दावा करण्यात आला होता. न्यायालयाने 4 फेब्रुवारीला या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहेत. इंद्राणीने तिच्या वकिलामार्फत न्यायालयासमोर अर्ज केला आहे.
मागील महिन्यात इंद्राणी मुखर्जीचे यांचे वकिल सना खान यांनी सांगितले होते की इंद्राणीने 27 नोव्हेंबर रोजी सीबीआयच्या संचालकांना पत्र लिहिले होते. तिच्या तुरुंगातील एका कैद्याने शीनाला काश्मीरमध्ये जिवंत पाहिले होते. श्रीनगरमध्ये सुटीवर असताना इंद्राणीची जेलमधील एक महिला कैदीने शिनाला जिवंत पाहिले असल्याचा दावा केला होता. संचालकांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय एजन्सीने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी इंद्राणीने केली होती.
पत्रात आणखी काय लिहिलंय..? -सीबीआय संचालकांना लिहिलेल्या पत्रात इंद्राणीने म्हटले आहे की, नुकतीच मी तुरुंगात एका महिलेला भेटले जिने तिला सांगितले की ती काश्मीरमध्ये मी शीना बोराला भेटली होती. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घ्या, अशी मागणी इंद्राणीने केली आहे. इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून ती 2015 पासून मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद आहे.
इंद्राणी सर्वोच्च न्यायालयात जाणार ? -इंद्राणी मुखर्जीने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, गेल्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यामुळे इंद्राणी आता जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.
वैद्यकीय चाचणी अहवाल काय म्हणतो ? -एम्सच्या फॉरेन्सिक विभागाने तयार केलेल्या या अहवालानुसार 2015 साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सीबीआयच्या चार्जशीटसोबत जोडलेला वैद्यकीय चाचणी अहवाल हा सापडलेल्या सापळ्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरच तयार करण्यात आला आहे. उंची, वय, लिंग या सर्व बाबी तो सापळा शीना बोराचाच असल्याचे स्पष्ट करणाऱ्या होत्या. 23 वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती, असेही अहवालात नमूद केले आहे. वेगवेगळ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचे मत, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, आरोपीचा कबुलीजबाब, पुरावे या सगळ्यांच्या आधारे शीना बोराची हत्या झाल्याचे सीबीआयने स्पष्ट केले होते.
काय आहे प्रकरण ? -इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात तिला प्रथम पतीपासून मुलगी झाली. तिचे नाव शीना बोरा होते. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुल व इंद्राणी मुखर्जीच्या पहिल्या पतीची मुलगी शीना बोरा यांचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा चालक श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीना व राहुल यांच्या संबंधाला इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे ( CBI ) सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात ( Byculla Jail ) बंद आहे.