मुंबई- महाआघाडी सरकारमध्ये शरद पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. कारण वाढीव वीज बिलासंदर्भात त्यांना निवेदन देऊनही आघाडी सरकारच्या वर्तणुकीत काहीही फरक पडलेला नाही. ग्राहकांवरचा वाढीव वीज बिलांचा बोजा कमी झालेला नाही, अशी सडेतोड टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यपालांना भेटायला गेल्यावर राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार शरद पवारांना अनेकांनी वीज बिले माफ करण्याची आणि वाढीव वीज बिले कमी करण्याची मागणी करणारी अनेक निवेदने दिली होती. परंतु त्यावर कोणतीही सकारात्मक कारवाई झालेली नाही. याचा अर्थ शरद पवारांच्या शब्दाला महाआघाडी सरकारमध्ये किंमत उरलेली नाही असाच होतो अशी टीका मनसे नेते बाळानांदगावकर यांनी केली आहे.
तर राज्यभरात जन आंदोलन-
राज्यात सध्या वीजबिल सवलतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यात आता या मुद्यावरून सुरू असलेल्या राजकारणात मनसेनेही उडी घेतली आहे. वीजबिल माफी देता येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केल्यानंतर मनसेने वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना निर्माण झाली आहे, त्यामुळे सरकारने सोमवारपर्यंत बील माफ करावे, अन्यथा राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला.