मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी त्यांनी दिलेल्या शपथपत्रात स्थावर व जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांच्या नावे चार कोटी 28 लाख 78 हजार 520 रूपयांची स्थावर मालमत्ता, तर आठ कोटी 10 लाख 86 हजार 688 रूपयांची जंगम मालमत्ता दाखवली आहे. पत्नी प्रतिभा यांच्या नावे तीन कोटी 23 लाख 55 हजार 421 रूपयांची स्थावर, तर 13 कोटी 47 लाख 54 हजार 299 रूपयांची जंगम मालमत्ता दाखवली आहे. सहा वर्षात पवारांची संपत्ती केवळ ६० लाखांनी वाढली आहे.
हेही वाचा -काँग्रेस जुन्यांच्याचं कोंडाळ्यात! नव्या नेतृत्त्वाला संधी द्यावी - शिवसेना
मालमत्तेमध्ये हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून तीन कोटी 62 लाख 92 हजार 341 रूपयांची जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले असून यात मागील सहा वर्षांत त्यांची प्रत्येक वर्षी दहा लाख प्रमाणे ६० लाख रूपयांची संपत्ती वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. रोख रक्कम ही 29 हजार 570 रूपये आणि त्यांच्या पत्नींकडे 25 हजार 750 असल्याचे नमूद केले आहे. तसेच एकत्र कुटुंब म्हणून दहा हजार 360 असे एकूण ६५ हजार ६८० रूपयांची रक्कम असल्याचे नमूद केले आहे.
इतर संपत्तीचा विवरण -
38 लाख 17 हजार 422 रूपयांचे 848.07 ग्रॅम सोने असून सहा लाख 70 हजार 179 रूपयांचे 15 हजार 171 ग्रॅम चांदीचे दागिने आहेत. एकूण 44 लाख 87 हजार 601 रूपयांचे दागिने आहेत, तर पत्नी प्रतिभा यांच्याकडे 19 लाख 59 हजार 970 रूपयांचे 414.528 ग्रॅम सोने, सात लाख 54 हजार 111 रूपयांचे 17 हजार 071 ग्रॅम चांदी असे एकूण 27 लाख 14 हजार 081 रूपयांचे दागिने आणि हिंदू विभक्त कुटुंब म्हणून त्यांनी 14 लाख 41 हजार 079 रूपयांचे तसेच दोन लाख 23 हजार 044 रूपयांचे पाच हजार 49.100 ग्रॅम चांदी असे एकूण 16 लाख 64 हजार 123 रूपयांचे दागिने पवारांनी आपल्या शपथपत्रात दाखवलेले असून एकही रूपयांचे त्यांच्यावर कर्ज दाखविण्यात आलेले नाही.
पवार यांच्या विविध बॅंकातील खात्यांवर तीन कोटी 37 लाख 14 हजार 851 रूपये, तर पत्नीच्या नावे बॅंकेत दोन कोटी 58 लाख 89 हजार 280 रूपये तर हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून तीन कोटी 43 लाख 89 हजार 258 रूपये त्यांच्या खात्यावर दाखवण्यात आले आहेत. तर कोट्यवधी रूपयांची बारामती, पुणे येथे शेती, बिगर शेती जमीन, वाणिज्य वापरासाठीची मालमत्ताही पवार यांनी आपल्या शपथपत्रात नमूद केली आहे. पवार यांच्या उमेदवारी अर्जासाठी अनामत रक्कम ही त्यांचे जावई सदानंद सुळे, पत्नी प्रतिभा पवार यांनी कऱ्हा डेव्हलपर्स ऍण्ड माईन्स प्रा. लि आणि सुप्रिया एंटरप्राईजेसमधून देण्यात आली आहे.