मुंबई -देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्याचे प्रमुख आणि पंतप्रधान जनतेशी वारंवार संवाद साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी देशातील जनतेचे कौतुक केले. देशातील प्रत्येक नागरिक कोरोनाच्या लढाईत सहकार्य करत असल्याचा अभिमान आहे, असे मोदी म्हणाले. तसेच रमजान ईदच्या अगोदर देश कोरोनामुक्त व्हावा, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. याद्वारे त्यांनी मुस्लिम जनतेच्या भावनांवर फुंकर मारण्याचे काम केले. मात्र, या दरम्यान केंद्र सरकार कुठे आहे? हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर सनसनीत टीका केली आहे.
जनतेला कोरोना सैनिक म्हणून मोदींनी जनतेला हरभऱ्याच्या झाडावर तर चढवले मात्र, कोरोनासाठी केंद्र सरकार काय उपाययोजना करत आहे याचा एकदाही उल्लेख केला नाही. सध्या देशाची आर्थिक व्यवस्था काय आहे. राज्यांनी परिस्थितीचा कसा सामना करावा, याबाबत बोलण्यास मोदी तयार नाहीत. कोरोनाचा सामना करता-करता राज्यांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या आहेत त्यामुळे येखून पुढे त्यांना केंद्राच्याच मेहरबानीवर अवलंबून रहावे लागणार आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी आहे. एकट्या मुंबईतून एका वर्षाकाठी सव्वा दोन लाख कोटींचा महसूल मिळत असतो. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने महसूलात कोट्यावधींची तूट येणार आहे. परिणामी एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार चालवणे कठीण होणार आहे. महाराष्ट्राचीच हीच परिस्थिती आहे, तर इतर राज्यांची काय अवस्था असेल, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.