मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी त्यांच्या आईला उद्देशून एक भावनिक पत्र लिहीले आहे. चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, गहिवर आणते. तुमच्या प्रेरणेच्या बळावर नेहमी उभारी घेण्याचा निर्धार केला. कौटुंबिक जबाबदारी व सामाजिक बांधिलकी समान न्यायाने सांभाळत, सामान्यांसाठी अखंड काम करण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून घेतली.
झुंज देण्याच्या बाळकडूमुळेच राज्यात आघाडी सरकार
पत्राची सुरुवात करताना ते लिहीतात, मागील वर्ष खूप धकाधकीचे गेल्याने पत्र लिहिण्यास उशीर झाला. लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामा आघाडीला यश आले नाही. याच कठीण काळात अनेक जवळचे आणि ज्येष्ठ सहकारी पक्ष सोडून गेले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचे आव्हान समोर होते. झुंज देण्याचे बाळकडू तुमच्या कडूनच मिळाले. खचून न जाता पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्याचा कानाकोपरा पिंजून घातला. पत्रात त्यांनी आईला बैलाने मारल्यानंतर पाय अधू झाला तरीही स्वतःला झोकून देत केलेल्या कामाची आठवणदेखील काढली.
तरूणांच्या पाठिंब्यामुळे नवा उत्साह
हे सर्व करत असताना तरुणाईच्या विश्वासामुळे नवा उत्साह मिळाला. साताऱ्यात मुसळधार पावसात घेतलेल्या सभेमुळे मतदार मतांतून व्यक्त झाला आणि राज्यात आघाडी सरकार आले. हे सर्व करत असताना माझ्या पहिल्या निवडणुकीचा अर्ज भरताना तुम्ही केलेले मार्गदर्शन माझ्या लक्षात होते.