मुंबई - दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नव्या संसद भवनावर झालेल्या स्मोक बॉम्ब हल्ल्यामुळे संसदेच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. सदरच्या सर्व प्रकाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त करत राज्यसभा सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र लिहून यात आपण हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे.
स्पष्टीकरण मागण्याचा खासदारांना अधिकार -शरद पवार यांनी देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये संसदेच्या सुरक्षेबाबत आणि विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाबाबत चिंता व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. 13 डिसेंबरला दोन तरुणांकडून सभागृहाच्या गॅलरी उड्या मारल्याने संसदेच्या सुरक्षेविषयी चिंता वाटत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे 2001 साली संसदेवर हल्ला झाला होता. त्याच तारखेला अशा प्रकारची घटना घडणे म्हणजे चिंता करायला लावणारी बाब म्हणता येईल. सत्य परिस्थिती अशी आहे की, घुसखोरांनी एका खासदाराच्या पासच्या मदतीने सभागृहात प्रवेश मिळवून गॅलरीत चढून स्मोक कॅन्डलसह लोकसभा सभागृहात उड्या मारल्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदारांकडून सरकारला खुलासा करण्याची मागणी करणे हे नैसर्गिक असून सरकारची नेमकी भूमिका काय, ते स्पष्ट करणं गरजेचं होतं. मात्र केंद्र सरकारने या संदर्भात कोणतीही भूमिका न घेता स्पष्टीकरण दिलं नाही. परंतु स्पष्टीकरणाची मागणी करणाऱ्या खासदारांनाचं निलंबन केलं. विलंबन करणं ही खेदजनक गोष्ट असल्याचंही पवारांनी पत्रात म्हटलं आहे. खासदारांवरील कारवाई ही संसदेच्या जबाबदारी व निःपक्षतेच्या विरोधात असून खासदारांना स्पष्टीकरण मागण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही पवारांनी पत्रात नमूद केलं आहे.