मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आईची आतापर्यंत न सांगितलेली एक गोष्ट सांगत आपल्या जन्मापासूनच शिक्षणाचा वारसा आपल्या घरातून कसा होता याचा उलगडा केला. शिक्षक भारतीने वडाळा येथे आज आयोजित केलेल्या अधिवेशनात पवार आपल्या आईने आपल्या जन्माच्या सातव्या दिवशीच आपल्याला पोटाशी धरून शिक्षण बोर्डाच्या मीटिंगला कसे नेले होते याची पहिल्यांदा माहिती दिली, आणि त्या आठवणींना उजाळा दिला.
शरद पवारांनी सांगितली आपल्या आईची 'ती' गोष्ट हेही वाचा - 'गांधींचे नाही तर नथुरामाचे विचार ऐकायचे का.?'
मागील सरकारने पहिलीच्या पाठ्यपुस्तकात शरद कमळ बघ, छगन कमळ बघ असे धडे आणले, त्यावर नाराजी व्यक्त करत पवार यांनी आपल्या घरातून शिक्षणाचा वारसा कसा होता. यासाठी आपल्या आईची आजपर्यंत न सांगितलेली गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, माझ्या आईची गोष्ट मी कधी सांगितली नाही. पण आज सांगतो. माझा जन्म झाल्यानंतर सात दिवसांचा झालो होतो. त्यावेळी स्कूल बोर्डाची पुण्याला मीटिंग होती. त्यावेळी बाळंतीण असलेली माझी आई सात दिवसांच्या बालकाला घेऊन मीटिंगसाठी निघाली. त्यावेळी एसटी नव्हती, दत्त सर्व्हिस नावाची बस असायची त्याने ती निघाली, आणि तो सात दिवसाचा बालक म्हणजे मी होतो. त्यामुळे मी सातव्या दिवशी शिक्षणाची मीटिंग पाहिली असेल त्याच्यासोबत 'कमळ' कसे दिसेल, असा टोला अभ्यासक्रम बदललेल्या भाजपला लगावला.
ते पुढे म्हणाले की, माझी आई त्यावेळी स्कूल बोर्डवर असायची. तिला शिक्षणाचा अतिशय रस होता. जसे सावित्रीबाई फुले होत्या, शाहू राजे होते, परिवर्तनाच्या चळवळीतील महान नेते होते हे तिचे आदर्श होते. तिचे वैशिष्ट्य होते की, ती कुठल्याही गावी अथवा आपल्या परिसरात शाळा नीट चालतात का नाही, शिक्षकांचे काही प्रश्न आहेत का, यासाठी ती अतिशय लक्ष द्यायची. त्यामुळे माझ्या लहानपणापासून कमळ बघायचे संस्कार नाहीत, त्यामुळे शिक्षण, शिक्षणाचे लढे, परिवर्तनाच्या अनेक गोष्टी आहेत आमच्या घरातून पाहिल्या असल्याचेही पवार म्हणाले.
हेही वाचा -' मी पंढरपूरला दर्शनाला जातो.. पण त्याचे राजकारण करत नाही'