मुंबई - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेत शरद पवारांनी काही गोष्टी पंतप्रधानांच्या निदर्शानास आणून दिल्या. या काळात सर्वच राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन उपाययोजना कराव्यात असेही पवार यावेळी म्हणाले.
आर्थिक संकट ओढावल्यास उपाययोजना कराव्या लागतील
कोरोनाचे संकट हे भयंकर संकट आहे. या संकटानंतर आर्थिक संकटे ओढावण्याची शक्यता आहे. ते ओढावल्यास कडक उपाययोजना कराव्या लागतील, असे पवारांनी म्हटले आहे. त्यादृष्टीने नॉन-प्लॅन एक्सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल. केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा, अशा सुचना त्यांनी मोदींना केल्या आहेत.
शेतकरी वर्ग व शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांना तातडीने दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलावीत. केंद्र सरकारने राज्य सरकारचे उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष पुरवावे असेही पवार म्हणाले. जीएसटी करता राज्यांचा वाटा अद्याप राज्याला मिळालेला नाही. अशा राज्यांकडे तो तातडीने वर्ग व्हावा, असे पवार म्हणाले. कोरोनामुळे शेती, उद्योग-व्यवसाय क्षेत्र अडचणीत आलेले आहे. शेतांमध्ये रब्बीचे पीक तयार आहे. परंतु फळं, फुलं, भाजीपाला यांची साठवणूक-विक्री या प्रत्येक बाबतीत अडचणी निर्माण झाल्यामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे शरद पवार म्हणाले.