मुंबई -महाराष्ट्राला कोरोना लसीचा होणारा तुटपुंजा पुरवठा आणि राज्यातल्या उल्लेखनीय लसीकरणाचा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विसर पडल्याने, त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट हर्षवर्धन यांच्याशी चर्चा करून त्यांना सामूहिक सहकार्याची आठवण करून दिली. पवार यांनी फेसबुकवरून केलेल्या थेट प्रक्षेपणात जनतेला अधिक काळजी घेण्याचेही आवाहन केले.
हेही वाचा -शंभर कोटी वसुली प्रकरणी 'सीबीआय'ने नोंदवून घेतला जयश्री पाटील यांचा जबाब
भाजप शासित राज्याच्या तुलनेत इतर बिगर भाजप पक्षांच्या सरकारला सापत्न वागणूक देण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केली. मात्र, पवारांनी याला बागल देत केंद्राला सहकार्याचे आवाहन केले आहे. राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सुद्धा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घ्यावी. आरोग्य मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत राज्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी आता सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे पवार यांनी म्हंटले.
राज्यातील स्तिथी भयावह, स्थितीला धैर्याने सामोर जा
कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने सामूहिकपणे आपण सामोर गेलेच पाहिजे. आता त्याला पर्याय राहिलेला नाही. समाजातील सर्व घटकांना, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांना विनंती आहे की, आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्यसरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे, असे कळकळीचे आवाहन शरद पवार यांनी राज्यातील जनतेला केले.
गेल्यावर्षीच्या तुलनेत, यावर्षी सक्रिय रुग्ण वाढले
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण ३४ हजार २५९ होते. तर, यावर्षी एप्रिलमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण ७९ हजार २६८ इतके आहेत.