मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अदानी समूहावरील आरोपांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यास अनुकूल नसले तरी त्यामुळे विरोधी ऐक्याला तडा जाणार नाही, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, 'पवारांनी अदानी समुहाला क्लीन चिट दिलेली नाही. त्यांनी चौकशी कशी करायची याच्या पर्यायांबद्दल मत व्यक्त केले आहे'.
'विरोधी ऐक्याला तडा जाणार नाही':एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार अदानींच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहावरील अहवालाच्या संदर्भात निर्माण केल्या जात असलेल्या नरेटीव्हवर टीका केली आहे. दुसरीकडे, जेपीसी चौकशीच्या मागणीवर विरोधक ठाम असल्याचे राऊत म्हणाले आहेत. ममता बॅनर्जी असोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, अदानींबद्दल त्यांची मते वेगवेगळी असू शकतात. परंतु त्यामुळे महाराष्ट्रात किंवा देशात विरोधी ऐक्याला तडा जाणार नाही, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले आहे.
पवारांचा सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला पाठिंबा : शरद पवार यांनी या आधी अदानी समूहावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला अनुकूलता दर्शविली होती. जेपीसीमध्ये सत्ताधारी पक्षाला संसदेत संख्यात्मक संख्याबळाच्या आधारे बहुमत मिळेल आणि यामुळे अशा चौकशीवर शंका निर्माण होईल, असे ते म्हणाले आहेत. 'जेपीसीला माझा पूर्णपणे विरोध नाही. या आधीही जेपीसी स्थापन झाल्या आहेत. मी देखील काही जेपीसीचा अध्यक्ष राहिलो आहे. जेपीसीची स्थापना संसदेत बहुमताच्या आधारे केली जाते. त्यामुळे जेपीसीऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी आहे असे माझे मत आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.
अदानी समूहाने फेटाळले सर्व आरोप : नायटेड स्टेट्सस्थित हिंडेनबर्ग रिसर्चने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांमध्ये स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. परिणामी नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात राहुल गांधी आणि इतरांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने याचा तीव्र निषेध केला आहे. अदानी समूहाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून, त्यांनी ते देशात लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करत असल्याचा दावा केला आहे.
हे ही वाचा :Eknath Shinde On Pawar : 'पवार अभ्यास करूनच बोलतात, तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घ्या', अदानी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला