मुंबई- राज्यात मुंबई, पुणे, जळगाव, मालेगाव, औरंगाबाद, पुणे येथे रुग्णसंख्या अधिक आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक व मालेगाव येथे संख्या अधिक आहे. मुंबई व पुण्यात संख्या अधिक असल्याची कारणे पाहिली तर दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या ठराविक ठिकाणी कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे, असे खासदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, देशात पाहिले तर 33 हजार इतकी रुग्णांची संख्या आहे. यात 1 हजार 74 लोक मृत्युमुखी पडले आहेत. 8 हजार 325 लोक उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात 9 हजार 915 ही कालची (दि. 29 एप्रिल) आकडेवारी आहे. यात 432 लोकांचा मृत्यू झाला व उपचाराने बरे होऊन 1 हजार 593 लोक घरी गेले आहेत.
झोपडपट्ट्या किंवा दाट वस्तीच्या ठिकाणी अधिक लोक राहतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेताना मर्यादा येतात. यामुळे दुर्दैवाने रोगाचा फैलाव होत आहे. आता राज्य शासनाने कोरोना तपासणीचा कार्यक्रम अधिक जोमाने हाती घेतला आहे. त्यात 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांना इतर आजार असल्याचे समोर येत असल्याची माहिती पवार यांनी दिली. आरोग्याच्या दृष्टीने आपण खबरदारी घेण्याची गरज आहे. वैद्यकीय विभाग पूर्णपणे जबाबदारी घेत आहे, तसेच कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचे काम पोलीस यंत्रणा पूर्ण जबाबदारीने करत आहे.