मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माढा मतदारसंघातून लोकसभा लढविणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट टिप्पणी केली. ते म्हणाले, की पवार साहेबांनी या वयात लोकसभा लढाऊ नये. माढा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास, भाजप त्यांचा पराभव करेल. यासंबंधी त्यांनी ई-टीव्ही भारतशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, की पवार छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचा विचार करतात. एक लोकसभा म्हणजे जवळ जवळ ६०० गावे मतदारसंघात येतात . एवढ्या मोठ्या परिसरात त्यांनी या वयात फिरणे अवघड आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा न लढवलेलीच बरी. पण त्यांनी लोकसभा लढवलीच, तर त्यांचा भाजप पराभव करेल असेही त्यांनी म्हटले.
राज्यातल्या दुष्काळी स्थिती आणि उपाय योजनाबाबत पाटील यांनी माहिती दिली. राज्यातल्या अनेक भागांचा आढावा घेण्यात आला असून, पाणी टंचाई असणाऱ्या गावात टँकर्स सुरु केले आहेत. ग्रामीण भागातील महिलांची गैरसोय टाळण्यासाठी टंचाईग्रस्त एक हजार गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी टाक्या बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले .
उस्मानाबाद, जालना, बीड, परभणी, अहमदनगर व औरंगाबाद या सहा जिल्ह्यात 8 गोशाळांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 7 हजार 357 जनावरे दाखल झाली आहेत. आवश्यकता असेल त्या ठिकाणी अर्जांची छाणनी करून तत्काळ चारा छावण्या सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडळस्तरावर जनावरांची संख्या वाढल्यास व संस्था अथवा व्यक्तींनी चारा छावणी सुरू करण्याची तयारी दर्शविल्यास एकापेक्षा अधिक चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही पाटील यांनी सांगितले