मुंबई :2 मे रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. यानंतर कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी शरद पवारांना केली आहे. यानंतर एक समीती गठीत करण्यात आली होती. त्या समितीची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे जेष्ट नेते प्रफुल पट्टेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलतांना प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार यांनी जाहीर केलेल्या समितीची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक झाली. त्यात आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या भावना व्यक्त करणारा प्रस्ताव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी शिफारस करण्यात आली आहे.आम्ही जे काही बोललो ते त्यांनी ऐकून घेतले. यावर पवांरांनी मला विचार करण्यासाठी वेळ हवा असल्याची मागणी केली आहे.
राजीनामा फेटाळला :शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली होती. शरद पवार यांनी अचानक घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धक्का देणारा होता. त्यानंतर पुढचा अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवार यांनी समिती नेमली. या समितीची आज बैठक झाली. या समितीच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. शरद पवार अध्यक्ष असतील, असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. यानंतर या समितीच्या नेत्यांनी ‘सिल्व्हर ओक’ येथे शरद पवार यांना आपला निर्णय कळवला आहे. यानंतर शरद पवार विचार करून निर्णय देतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया - यावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले, देशातील विविध नेत्यांचा आग्रह तसेच राज्यातील लाखो कार्यकर्त्यांचा शरद पवारांवर विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांनीच अध्यक्षपदी राहावे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. समितीचा ठराव शरद पवार यांच्या कानावर घातला आहे. 'विचार करून सांगेन,' असे शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी समोर कोणता पर्याय :शरद पवार निर्णय कधी जाहीर करणार? यावर जयंत पाटल म्हणाले, 'शरद पवार यांनी समितीतील सर्वांचे मत ऐकून घेतले आहे. आम्ही सर्वांनी विनंती केली आहे, लवकरात लवकर निर्णय द्यावा. कारण महाराष्ट्र, देशातील कार्यकर्ते निर्णयाची वाट पाहत आहेत." शरद पवारांनी निर्णय नाकारला तर पर्याय काय असणार? असे विचारले असता जयंत पाटल म्हणाले, 'शरद पवारांशिवाय पर्याय नाही, यावर कोणतीही चर्चा झाली नाही.'