मुंबई - देश अडचणीतून जातोय. सामाजिक ऐक्य कसे राखता येईल याची चिंता आहे. देशाची सूत्रं ज्यांच्या हाती आहे त्यांनी एका विशिष्ट वर्गाच्या हातात सूत्र ठेवण्याची भूमिका घेतली आहे. सत्ताधाऱ्यांकडून एका लहान समाजाला टार्गेट केले जात आहे. ते आपल्या देशाचे आहेत का, यावर प्रश्न निर्माण केले जात असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. माजी आमदार हरिभाऊ बधे व अर्जुन सलगर यांनी वंचित बहुजन आघाडीतून रविवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यापासून मुस्लिम समाज सहभागी असताना त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याचे काम केले जात आहे. जनगणना सुरू झाली त्यात ओबीसींची स्वतंत्र गणना करण्याची आपली मागणी असल्याचे पवार म्हणाले. मात्र, ही जनगणना काही वेगळ्या प्रकारे सुरू आहे. त्यात एका विशिष्ट वर्गाला वगळण्याचे काम होत असल्याचा संशय पवारांनी व्यक्त केला.