मुंबई- असत्य गोष्टीवरुन जर मला कोणी तरुंगात पाठवत असेल तर त्याचे मी स्वागतच करतो. कारण तरुंगाचा मला कधी अनुभव नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार
मी कोणत्याही सहकारी बँकेचा संचालक आत्तापर्यंत नव्हतो. त्यामुळे माझा काहीच संबंध नाही. तरीही माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला असेल तर मी त्याचा स्वागत करतो आणि धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. मला आणि माझ्या पक्षाला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या संस्थांशी संबंध नसतानाही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला याचा परिणाम विरोधकांना दिसेल असेही पवार म्हणाले.
हेही वाचा - काय आहे शिखर बँक घोटाळा?
यापुढे राज्यात आपले दौरे कुठे थांबविले जाणार नसून, माझा प्रचार सुरूच राहणार आहे. पुढील दौऱ्याचे नियोजन हे दोन-तीन दिवसांत मी करत आहे. मला ईडीची नोटीस नाही, मी कोणत्याच शिखर बँकेचा संचालक नसल्याचे पवार म्हणाले. भाजप सुडाने माझ्यावर कारवाई करायला लावत आहे. पण, जनता सर्व पाहत आहे. त्यामुळे जनताच काय आहे तो निर्णय घेईल, असेही पवार म्हणाले.