मुंबई- दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येणारे लाखो भक्त आणि त्यांची गर्दी लक्षात घेऊन लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंडळाच्या निर्णयाचे कौतुक केले.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून आज 'आरोग्योत्सव' या प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पवारांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार यांनी लालबागचा राजा मंडळाच्या निर्णयाचे कौतुक केले. तसेच, महाराष्ट्रातील ९२ हुतात्मा पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश देण्याचे काम मंडळाने हाती घेतले आहे. याची सुरुवातही आज शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्याचबरोबर गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर लढताना वीरगती मिळालेले जवान सचिन मोरे व पुलवामामध्ये हुतात्मा झालेले जवान सुनील काळे यांच्या कुटुंबियांना आज प्रत्येकी 2 लाख रुपयांचा धनादेश सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाने या उपक्रमांद्वारे अतिशय चांगला आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. त्याबद्दल मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे शरद पवार यांनी अभिनंदन केले. पवार म्हणाले की, लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उत्सव लालबागचा राजा मंडळाने आजपर्यंत साजरा केला आहे. भारत-चीन संदर्भात सुरू असलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले की, चीनच्या जवानांना त्यांची जागा दाखवायचे काम आपल्या सैनिकांनी यावेळी केले होते. चीन आणि सियाचीनच्या सीमेवर आपले जवान देशाचे संरक्षण करतात. मी संरक्षण मंत्री असताना १९९३ ला चीनला गेलो असताना तिथल्या पंतप्रधानांसोबत करार केला होता. लडाख सीमेवर शस्त्र संघर्ष करायचा नाही, असे ठरले होते. अशी आठवण पवार यांनी यावेळी करून दिली.