मुंबई :'लोक माझे सांगाती' पुस्तकात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षातील अनेकांना धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी या विषयावर शरद पवारांच्या भूमिकेनंतर मी बोलणार असे म्हटले आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील संबंध ताणले जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरे थेट निशाण्यावर :लोक माझे सांगाती या पुस्तकातून शरद पवारांनी अनेक बाबींवर स्पष्टीकरण दिलं असलं तरी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या शिवसेना या पक्षाबद्दल अनेक बाबी उघड केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत शरद पवारांनी या पुस्तकातून मुद्दे उपस्थित केलेले आहेत.
काही ठराविक मुद्दे...१) सर्वात अगोदर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कटील डाव हा दिल्लीतील कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नसल्याचं सांगितल्यानंतर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक बॉम्बस्फोटच होता. कारण मागील अनेक वर्षापासून भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कटील डाव आखात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे, त्यांचे नेते सातत्याने करत होते. याच मुद्द्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर उध्दव ठाकरे यांना आता या मुद्द्यावर तोंडघशी पडावे लागले आहे.
२) त्याचबरोबर २०१९ मध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फार आपुलकी नव्हती. त्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन करण्यास मोदी अनुकूल होते असेही शरद पवारांनी पुस्तकात सांगितल्याने, हे सुद्धा उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागणारे आहे.
३) मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांनी संघर्ष न करताच राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम लागला, असेही शरद पवारांनी या पुस्तकात नमूद केल्याने उद्धव ठाकरे कुठे कमी पडले हे सुद्धा त्यांनी थेट सांगितले आहे.
४) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना सुद्धा शरद पवारांनी राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींबाबत बितंबातमी असणे आवश्यक असते. त्यावर बारीक लक्ष ठेऊन, उद्या काय होऊ शकते याचा अंदाज घेण्याची क्षमता सुद्धा राज्याच्या प्रमुखामध्ये असायला हवी. त्याप्रमाणे आज काय चालले आहे. आज काय पावले उचलायला पाहिजेत. याचे राजकीय चातुर्य असणे सुद्धा आवश्यक असते, याबाबत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. असे सांगितल्याने उद्धव ठाकरे यांना अनुभव नसल्याने हे घडले असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
५) या पुस्तकामध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना, सरकार स्थापन झाल्यावर काही काळानंतर उद्धव यांच्या आजारपण वाढले. त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. त्या कारणाने डॉक्टरांच्या वेळापत्रकानुसार त्यांना काम करावे लागत होतं, असेही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे त्यांना काही मर्यादा होत्या मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रालय फक्त दोनदा जाणे आमच्यासारख्यांना पचनी पडणारे नव्हतं, असंही शरद पवारांनी आत्मकथेमध्ये नमूद केले आहे.
भाजपचे कटकारस्थान- संजय राऊत :लोक माझे सांगाती, या पुस्तकात शरद पवारांनी लिहिलेल्या अनेक बाबीनंतर
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधावर आता खुलेआम चर्चा होऊ लागली असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मधील संबंध आता मोठ्या प्रमाणात दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरीही शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या 'सामना' च्या अग्रलेखातून बऱ्याच गोष्टींवर भाष्य करण्यात आलेलं आहे. परंतु यामध्ये विशेष करून राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची भाजप सोबत वाढती जवळीक हे प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादीतून एक गट बाहेर पडत असताना त्याला थांबवण्यासाठी शरद पवारांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या खुलासावर कुठलही भाष्य अग्रलेखात करण्यात आलेलं नाही.
भाजपने शिवसेना फोडली :उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडून एकीला तडा जाईल, असं काही होणार नाही असे सांगितले आहे. तर उलटपक्षी या विषयावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितल आहे की, भाजप सत्तेसाठी कोणालाही शेजेवर घेण्यास कधीही तयार असतो. भाजपाची नेहमी सत्तेसाठी भूमिका कायम आहे. त्यांनी मुफ्तींबरोबर युती केली होती. तसेच शिवसेना फोडून मिंधे गट जवळ घेतला, असे असताना ते कोणालाही जवळ घेऊ शकतात. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया सुरू असलेले १० ते १२ लोक त्यांनी बरोबर घेतले. अशा परिस्थितीत ते कोणत्याही प्रकारचा राजकीय व्यभिचार करू शकतात अशी टीकाही संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे. तर दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर या राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत बाबी असून शरद पवार हे जानकार आहेत. त्यासाठी ते महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय घेतील व याचा कुठलाही परिणाम लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपावर होणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
आघाडीवर कुठलाही परिणाम नाही- जयंत पाटील :शरद पवारांच्या या पुस्तकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या तील संबंध व्यवस्थित राहतील का? यावरही आता शंका निर्माण झाली आहे. परंतु या संपूर्ण घडामोडी वर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे, प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील यांनी सांगितले आहे, की या सर्व गोष्टींचा कुठल्याही पद्धतीचा परिणाम हा महाविकास आघाडीवर होणार नाही. महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे. महाविकास आघाडी तुटेल अशा पद्धतीच्या चर्चा रंगवण्यात आल्या आहेत. शरद पवार हेच महाविकास आघाडीचे नेते राहणार आहेत.
हेही वाचा - Sharad Pawar Autobiography: शरद पवारांच्या आत्मचरित्रातील 'त्या' दोन मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाची कोंडी