मुंबई- सध्या कोरोनाने धुमाकुळ घातला असून सर्वांनी संचारबंदीचे नियम पाळा. सामाजिक अंतर टिकवून ठेवा, असा सल्ला देत येणाऱ्या शब-ए-बारात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी घराबाहेर पडू नका, घरात राहून प्रार्थना करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार पवार हे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत. दिल्लीतील मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये एक कोरोनोचा रूग्ण होता. यामुळे जमातमधील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. येणाऱ्या 8 व 9 एप्रिलच्या दरम्यानची रात्र ही शब-ए-बारात आहे. त्यावेळी मुस्लीम सामाजाची विशेष नमाज असते. पण, कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी सर्वांनी घरात राहूनच नमाज अदा करावी. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीवेळी घराबाहेर पडून गर्दी करू नका. यामुळे कोरोना फैलाव वाढण्याची शक्यता आहे. घरात राहूनच या संकटापासून मुक्ती व्हावी, अशी प्रार्थना करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.
दिल्लीच्या मरकजमध्ये देश-विदेशातून हजारो तबलिगी जमातचे लोक धार्मिक कार्यक्रमासाठी जमा झाले होते. हा कार्यक्रम लॉकडाऊनच्या पूर्वीच आयोजित करण्यात आले होते. पण, या ठिकाणी विदेशातूनही लोक आल्याने त्यातील कोणालातरी कोरोनाची लागण झाली होती. त्याद्वारे जमातमधील इतरांनाही कोरोनाची लागण झाली. लॉकडाऊनपूर्वीच त्यातील काही जण आपापल्या घरी परतले होते. पण, मरकजमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने देशभरात खळबळ माजली आहे. विविध राज्यातील लोक यामध्ये सहभागी असल्याने सर्व राज्यातील जिल्हा प्रशासनाने मरकजला जाऊन आलेल्यांनी समोर येत माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.
त्यामुळे शब-ए-बारात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी गर्दी न करता घरात राहूनच प्रार्थना करा व जे निजामुद्दीन येथे घडले ते घडू देऊ नका, असे आवाहन शरद पवार यांनी सर्वांना केले आहे. तसेच संचारबंदीच्या काळातही अनेक जण रस्त्यावर फिरत आहेत. काही ठिकाणी सामाजिक अंतर ठेवले जात नाही. यामुळे आपल्याच जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलीस व प्रशासनाला सहकार्य करुन स्वतःची व परिवाराची काळजी घ्या. गर्दी होईल, अशा कार्यक्रमाचे आयोजन काढा. असेही पवार म्हणाले.
हेही वाचा -सगंमनेरच्या काँग्रेस कार्यालयात आपत्कालीन कक्ष सुरू - बाळासाहेब थोरात