मुंबई Sharad Pawar On Nanded Death Case : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष ( शरद पवार गट ) शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यातील शासकीय यंत्रणांचं हे अपयश असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे आता नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरुन राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय म्हणाले शरद पवार :नांदेड इथल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूत 12 चिमुकल्यांचा समावेश आहे. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात अशाचप्रकारे दोन महिन्यापूर्वी 18 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला गांभीर्यानं न घेतल्यानंच नांदेडमधील घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. यातून शासकीय यंत्रणांचं अपयश स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी वेळीच अशा घटनांकडं गांभीर्यानं लक्ष देऊन, यासाठी ठोस पावलं उचलावीत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार यांनी नांदेडच्या घटनेबाबत आपलं मत 'एक्स'वर स्पष्ट केलं आहे.