मुंबई :भारत आणि इंडिया हा इश्यु का निर्माण केलाय, हेच मला समजतं नाही, असं शरद पवार म्हणालेत. जी 20 कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान यांच्या नावापुढे भारत नाव लिहिलं होतं. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी विधानसभेमध्ये एक ठराव केलाय की, इंडियाऐवजी भारत म्हणायचं. हा ठराव एक मतानं मंजूर झालाय. मात्र, ठरावाविरोधात एकच पक्ष विरोधात होता. त्याने सभात्याग केला, तो पक्ष भाजपा होता. 2004 चा ठरावा माझ्याकडे आहे. भारत नावाला विरोध करण्याचं काम ज्यांनी केलंय, ते आज त्या प्रश्नावरून वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. इंडिया की भारत हे घटनेच्या पहिल्याच ओळीत स्पष्ट होतंय.
मोदी सरकारला सवाल :मोदी सरकारनं इंडिया नावाने किती योजना आणल्या. गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा फलक आहे, मग त्याला काय म्हणायचं असं सवाल मोदी सरकारला पवारांनी विचारलाय. जी 20 परिषदेची बैठक यापूर्वी भारतात दोन वेळा झाली. मात्र, अशा प्रकारच्या भव्यता आणि दिव्यतेचा वापर करून यनिमित्तानं मूलभूत प्रश्नऐवजी काही ठराविक लोकांचा प्रचार करण्यासाठी त्याचा वापर केला जातोय. देशातील सध्या महत्त्वाच्या गोष्टींना बाजूला ठेवून आपल्याला हवे ते वातावरण तयार करायचे. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत पावले टाकायचे. या देशातील सामान्य माणसाचं हित, महागाई, बेरोजगार यासह कोणत्याच प्रश्नाकडे राज्यकर्ते बघत नाही, असं ते म्हणालेत.
निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, राजकारणात पहिली निवडणूक काँग्रेसकडून लढून माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. या दरम्यान मी सहा प्रकारचे वेगवेगळे चिन्हं घेऊन निवडणूक लढलो, आणि लोकांनी निवडून दिलं. अजित पवार गटाचं नाव न घेता ते म्हणाले की, जुन्या माणसांकडून सातत्याने सांगितलं जातंय की, पक्ष नाव आणि पक्ष चिन्हं आम्हालाच मिळेल. यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात चलविचल सुरू होते. मात्र काही काळजी करण्याची गरज नाही. निवडणूक आयोगावर याबाबत कोणती टीका टिप्पणी करायची नाही, तो जे निर्णय देतील अंतिम आहे. शिवसेनेच्या काही लोकांना ज्याप्रमाणे त्यांच्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला, तसाच निर्णय घेतला जाऊ शकतो असं त्यांच्या मनात आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलंय.
कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायची संधी :आज खऱ्या अर्थानं पुन्हा प्रस्थापित व्हायला एक नवीन संधी मिळालीय. नवीन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायची संधी मिळाली आहे. लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडतं नाही. देशाच्या पंतप्रधान यांनी भोपाळच्या सभेत पक्षावर हल्ला केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्ट पक्ष असं म्हणतात, काही दिवसातच ज्यांच्यावर आरोप केलेत, त्यांनाच सोबत घेतात. याचा अर्थ ते किती तत्वनिष्ठ आहेत, हे लक्षात येतं.