मुंबई: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी या प्रकरणी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट तसेच बारसु रिफायनरी प्रकल्प संदर्भातील आपली भूमिका आणि इतर राजकीय घडामोडीवर भाष्य केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या मुद्द्यावरून शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.
'आंदोलकांना विश्वासात घेतले पाहिजे' :बारसू प्रकल्पाबबात माध्यमांशी बोलताना अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, 'कोणताही प्रकल्प होत असताना लोकांना विश्वासात घेतले पाहिजे. आंदोलकांना विश्वासात घेतले पाहिजे. बारसू विरोधकांची तातडीने बैठक घ्यावी. सामंतांनी रिफायनरीबाबत आढावा घेतला आहे. आंदोलकांचा विरोध काय आहे, हे समजून मार्ग काढावा. विरोध नेमका का आहे, हे समजून घ्या. बारसूतील आंदोलकांची समजूत काढावी. जनभावनेचा आदर करावा. बारसूत उद्या रिफायनरी विरोधकाबाबत बैठक आहे. स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. लोकांच्या अडचणी असतील त्या सोडविल्या पाहिजेत. विरोधाची कारणे लक्षात घेऊन मार्ग काढावा'.
'मी बारसूला जाणार नाही' :पवार पुढे म्हणाले की, राज्यात कोणी एखादा प्रकल्प उभा करत असेल आणि प्रकल्प महत्त्वाचा असेल तर तेथील लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. स्थानिकांच्या भावना समजून घेऊन मार्ग काढला पाहिजे. मी उद्योग मंत्र्यांकडून बारसू रिफायनरीचा आढावा घेतला. बारसू येथे सध्या जमिनीची मोजणी सुरू असल्याचं त्यांनी मला सांगितलं. आंदोलकांची तीव्र नाराजी असल्याचं मला प्रसार माध्यमांमधून समजलं. बारसु येथे मी जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाचे काही सहकार जाणार आहे.
'मुख्यमंत्री बदलाबाबत मला माहिती नाही' : अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल विचारले असता राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले, की मी त्यांना अनेकदा असा वेडेपणा करू नका, असे सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलण्यात येणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर पवार म्हणाले, की मुख्यमंत्री बदलाबाबत मला माहिती नाही. राऊत पत्रकार आहेत, त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल. सत्ता आल्यास मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला देण्यात येणार हे वृत्त म्हणजे टेबल न्यूज असल्याचे सांगत त्यांनी असा प्रस्ताव आल्याचे फेटाळले.
हे ही वाचा :CM Eknath Shinde News: दौऱ्यावर असूनही मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन पद्धतीने केला ६५ फाईल्सचा निपटारा; आज घेणार अमित शाहंची भेट