मुंबई - एक शरद बाकी गारद, या बहुचर्चित शरद पवार यांच्या मुलाखतीचा आज पहिला भाग प्रक्षेपित करण्यात आला. 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून शरद पवार यांनी, या मुलाखतीमध्ये अनेक घडामोडींवर भाष्य केले. यात त्यांनी राजकीय, सामाजिक, लॉकडाऊन या सारख्या विषयावर मत मांडले. २०१९ च्या विधानसभा निकालावर भाष्य करताना, शरद पवार यांनी, शिवसेनेने भाजपला साथ दिली नसती तर भाजपला राज्यात केवळ ४० ते ५० जागा मिळवता आल्या असत्या, असे सांगितले.
संजय राऊत यांनी शरद पवार यांना, लोकशाहीमध्ये १०५ जागा असणारा प्रमुख पक्ष राज्यात सरकार स्थापन करु शकला नाही. यासंदर्भात तुमचं काय मत आहे, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, 'भाजपाने १०५ पर्यंत कशी मजल मारली. मुळात पक्ष प्रमुख कसा झाला, याच्या खोलात जायला पाहिजे. माझे स्पष्ट मत आहे, १०५ हा जो आकडा आहे. त्यामध्ये शिवसेनेचे योगदान फार मोठे होते. त्यामध्ये शिवसेना सहभागी नसती किंवा शिवसेनेला त्यामधून वजा केले तर तो आकडा ४०-५० च्या आसपास असता. भाजपचे काही नेते आमचे १०५ आमदार आहेत, असे सांगत आहेत. मात्र त्यांना १०५ वर पोहोचवण्याचे काम ज्यांनी केले त्यांनाच जर गृहित धरण्याची भूमिका घेतली तर मला वाटत नाही वेगळं काही करण्याची गरज होती, असे मत पवारांनी व्यक्त केले. पुढे बोलताना पवार यांनी, भाजपाची मित्र पक्षाला गृहित न धरण्याची भूमिका अयोग्य असल्याचे सांगितलं.
महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतोय का? असे विचारले असता, पवार म्हणाले, कोरोनासारखं मोठं संकट तीन विचाराचे तीन पक्ष, पण सगळे जण एक विचाराने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. त्यांच्या धोरणाच्या पाठिशी आहोत आणि या परिस्थितीला तोंड देताहेत. लोकांच्या पाठिशी मजबुतीने उभे राहतायेत. हे घडू शकलं याचा अर्थ माझी खात्री आहे की हे एकदिलाने काम सुरू आहे. म्हणून हे घडू शकलं. या तिन्ही पक्षात यत्किंचितही नाराजी नाही.