मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वा वर्धापन दिन आज मुंबईसह राजधानी दिल्लीत साजरा करण्यात आला. दिल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शरद पवारांच्या या घोषणेने अजित पवारांना बाजूला सारले की काय, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसदार कोण? : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाचं अध्यक्षपद शरद पवारांनी स्वत: कडे ठेवावं आणि कार्याध्यक्षपद सुप्रिया सुळे यांना द्यावं, अशी मागणी पक्षातून करण्यात आली होती. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांनी दोन व्यक्तींना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये अजित पवार बाजूला सारले गेले की काय, अशा चर्चांना वेग मिळाला आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कोणती जबाबदारी? : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदासोबत गोवा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व झारखंड या पाच राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. ते या राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाची जाबाबदारी सांभाळतील. तर सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांतील निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार सुनील तटकरे यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बिहार, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.