मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (सोमवार) मातोश्री येथे बैठक झाली. पोलीस उपायुक्तांच्या १० अंतर्गत बदल्यांवरून महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेल्या मतभेदाचे पडसाद मातोश्रीवर उमटले. शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत बदली प्रकरणावरून पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. तसेच यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही हजर होते.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ३ दिवसांपूर्वी आपल्या अधिकारात १० उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. त्या बदल्या तीन दिवसांमध्ये रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने हस्तक्षेप केल्याने राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर आज शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीने भाजप विरोधात राजकारण करत असताना आमच्याच पक्षाचे पारनेर येथील नगरसेवक राष्ट्रवादीकडून फोडले गेल्याने त्यावरील नाराजी मुख्यमंत्र्यांनी पवारांपुढे व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.