मुंबई- सध्या कोरोना विषाणू हा आरोग्याच्या दृष्टीने सर्वात मोठे संकट आहे. मात्र, या महामारीनंतर येणारे आर्थिक संकटही उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे जनतेने वायफळ खर्च करू नये, काटकसर करावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. कोरोना विषाणूशी लढा या विषयावर शरद पवार यांनी आज सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, कोरोनावर आपण विजय मिळवणारच आहोत. पण, त्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे घरात राहा. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठे आहे. जर सूचनांचे पालन केले नाही तर आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा पवार यांनी जनतेला दिला.
मुबलक अन्नसाठा उपलब्ध
राज्याला पुरेल इतका मुबलक अन्नधान्य साठा आहे. त्यामुळे जिथे आहात तिथे राहा. ऊसतोड कामगारांची व्यवस्था कारखानदारांनी करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली केली आहे.
रुग्णालयाची दारे बंद करू नका
काही डॉक्टर्स आपले दवाखाने बंद ठेवत आहेत, ही गंभीर बाब आहे. रूग्ण सेव हीच इश सेवा आहे हे विसरू नका. त्यामुळे रुग्णांसाठी आपल्या दवाखान्याची दारे उघडी ठेवा, असे आवाहन पवार यांनी केले.
अशा काळात सेवा देणाऱ्यांचे अभिनंदन
कोरोनासारख्या संकटाच्या काळा अत्यावश्यक तसेच जीवनावश्यक सेवा देणारे, पोलीस, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, गॅस सिलिंडर पोहोचविणारे कर्मचारी, पेट्रोल पंप कर्चमारी व अन्य लोक सेवा देत आहेत. यामुळे त्यांचे पवार यांनी अभिनंदन केले.
ही कमाई करण्याची नाही तर लोकांना मदत करण्याची संधी
ही वेळ संकटाची वेळ आहे. आपल्या सर्वांना एकजुटीने कोरोनाशी दोन हात करायचे आहेत. त्यामुळे या काळात संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांनी ग्राहकांना चढ्या दराने विक्री करू नये. साठेबाजी करू नये. आपल्या आसपास जर कोणी गरजू असेल तर त्यांना मदत करावी. कोणी उपाशी राहणार नाही ना याची काळजी घ्यावी, कारण ही संधी कमाईची नाही तर लोकांना मदत करण्याची आहे, पवार म्हणाले.
वैद्यकीय स्टाफ मोठा आधार देत आहे
सध्याच्या घडीला सर्वात जास्त वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची धावपळ होत आहे. काही जण आपली रुग्णसेवा करताना आपल्या खाण्या-पिण्याकडेही लक्ष देत नाहीत. समोरचा रुग्ण लवकरात लवरकर कसा बरा होईल, यासाठी धडपड करत आहेत. कोरोना विरोधाच्या या लढाईमध्ये वैद्यकीय स्टाफ मोठा आधार देत असल्यचे पवार म्हणाले.
पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ आणू नका
पोलीसही तुमच्यासारखेच मनुष्य आहेत. त्यांनाही तुमच्या सारखा कुटुंब आहे. सध्या पोलीस तुमच्या सर्वांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आपले कुटुंब सोडून उभे आहेत. त्यामुळे घराबाहेर पडू नका. ही सक्ती तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना भाग पाडू नका, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा -पार्श्वभागावर दंडुका मारणे ही समाजसेवा अन् आरोग्यसेवाच, फडणवीसांना सुनावले