नवी दिल्ली -सैन्य दलाच्या के. के. रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २३ गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या गावांमधील लोकसंख्या ही आदिवासीबहुल असून त्यांचे उपजीविका व सुरक्षेबाबचे प्रश्न मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांकडे स्थानिकांच्या प्रश्नांची दखल घ्यावी तसेच के. के. रेंजच्या पुढील विस्तारीकरणास स्थगिती देण्याची मागणी केल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके उपस्थित होते.
२३ गावांमधील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. कष्ट व मेहनत करून ते उपजीविका करतात. या आदिवासींना वनजमीन वाटपाची प्रक्रिया गेल्या काही काळापासून सुरू होती. मात्र, आता के.के. रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे कारण सांगून त्यांना वाटप नाकारण्यात येत आहे. ही बाब शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निदर्शनास आणून दिली.
राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर आर्थिक संस्थांकडूनही स्थानिकांना या कारणास्तव कर्ज नाकारले जात आहे. शूटिंग रेंजमुळे दुसरे मोठे प्रकल्पही इथे होऊ शकत नसल्याने येथील आदिवासी जनतेसाठी उत्पन्नाचे साधन नष्ट होऊ लागले आहे, हा मुद्दा शरद पवार यांनी संरक्षणमंत्र्यासमोर मांडला.